E - Vehicle : पुणेकरांसाठी ई-वाहने सक्षम पर्याय ठरेल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:45 IST2026-05-13T10:44:41+5:302026-05-13T10:45:22+5:30

पुणे मुळातच देशातील ऑटोमोबाईल हब असल्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पुणेकर कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

pune news will e-vehicles be a viable option for Pune residents | E - Vehicle : पुणेकरांसाठी ई-वाहने सक्षम पर्याय ठरेल का ?

E - Vehicle : पुणेकरांसाठी ई-वाहने सक्षम पर्याय ठरेल का ?

पुणे : शहर व उपनगरातील अनेक त्रुटींमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही पुणेकरांसाठी सक्षम पर्याय ठरू शकलेली नाही. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी 'इलेक्ट्रिक वाहनांचा' जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. सध्यस्थितीत ईव्ही गाड्यांच्या वापराबाबत पुणेकरांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे.

ईव्ही गाड्यांच्या पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत चढ्या किमती, पुरेशी चार्जिंग स्टेशन नसणे, ईव्ही गाड्यांनी अचानक पेट घेतल्याच्या घटनांमुळे ईव्ही वाहन खरेदीचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. २०२४- २५ मध्ये दुचाकी व चारचाकी १२ हजार ७३७ विक्री ईव्ही गाड्यांची झाली तर २०२५-२६ मध्ये तीन पटीने वाढ होऊन ३७ हजार ८०८ गाड्यांची विक्री झाली आहे; मात्र पुण्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे ईव्ही गाड्या हा पर्याय ठरू शकणार आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पुणे मुळातच देशातील ऑटोमोबाईल हब असल्याने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पुणेकर कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्र सरकारने २०२५-२०३० साठी नवीन ईव्ही धोरण जाहीर केले आहे. यामध्ये नवीन निवासी इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंगसाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे. पुणे आरटीओच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ई-वाहनांच्या नोंदणीत तिप्पट वाढ झाली आहे. ई-वाहनांच्या खरेदीवर सबसिडी आणि पायाभूत सोयी देण्याचे ठरले असले तरी शहरात पुरेसी चार्जिंग स्टेशन्सचे जाळे नसल्याने नागरिकांना गाड्या चार्जिंग करणे कठीण होत आहे.

- ईव्ही वाहनांच्या भरमसाठ किमती

शहर आता 'वाहनांचे शहर' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शहरात व उपनगरात दुचाकी व चारचाकी अशा ४३ लाखांवर गाड्यांची संख्या आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत घरटी दोन गाड्या अशी वाहनांची संख्या झाल्याने हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला असून वाढते प्रदूषण कसे रोखायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ईव्ही वाहन खरेदी करताना सर्वांत मोठा अडथळा म्हणजे तिची किंमत. सामान्य पेट्रोल गाडीच्या तुलनेत ईव्हीच्या किमती भरमसाठ आहेत. यामध्ये 'बॅटरी' हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. ईव्हीच्या एकूण किमतीपैकी सुमारे ३५ टक्के ते ४५ टक्के खर्च केवळ बॅटरीचा असतो. लिथियम, कोबाल्ट आणि निकेल यांसारख्या दुर्मिळ खनिजांच्या किमती जागतिक बाजारपेठेत अस्थिर असतात. यामुळे ईव्ही गाड्यांची दुचाकीसाठी १ लाख ते ८५ हजार रुपये मोजावे लागतात. तर चारचाकीसाठी १४ लाख रुपये लागतात. साधारण दुचाकी ८५ हजारांपर्यंत येते तर चारचाकीसाठी ४ ते ६ लाख जागा मोजावे लागतात. हे सामान्यांना परवडणारे आहे का? त्यामुळे सुरुवातीला जास्त पैसे भरून भविष्यात इंधन वाचवायचे की सध्या खिशाला परवडणारी पेट्रोलची गाडी वापरायची? अशा संभ्रमात ग्राहक आहेत.

- चार्जिंग स्टेशन्सची उपलब्धता नाही

राज्यात एकूण ईव्ही वाहनांची नोंदणी २९ लाखांवर गेली आहे. यामध्ये पुण्याचा मोठा वाटा असला तरी मुख्यत: चार्जिंग सेंटरची कमतरता असून चार्जिंगसाठी लागणारा जादा वेळ ही मोठी समस्या आहे. गाडी चार्ज होण्यासाठी ५-६ तास लागतात. तर जुन्या सोसायट्यांमध्ये चार्जिंग पॉईंट बसवण्यासाठी जागा आणि विजेची अडचण येत आहे. अनेकदा सोसायटी कमिटीकडून परवानगी देण्यात येत नाही. तसेच सर्व्हिसिंग सेंटर कमी असून सर्व्हिसिंगसाठी जास्त वेळ लागतो आणि १५ ते महिनाभर ही मोठी अडचण आहे. महानगरपालिकेने चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम हाती घेतले असले तरी चार्जिंग स्टेशन्स कमतरता आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि पुणे-नगर हायवेवर दर २५ किमीवर चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून दिले पाहिजेत.

 दैनंदिन प्रवासासाठी सामान्यांनी ईव्ही वाहन खरेदी करणे हा एक उत्तम आर्थिक निर्णय ठरू शकतो; मात्र पुण्यात रस्ते आणि चार्जिंग स्टेशन पुरेसे नसल्याने ग्राहकांमध्ये गाडी खरेदीबाबत संभ्रमावस्था आहे. - महेश अष्टुळ, ग्राहक संतनगर पुणे


पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर आणि इंधन खर्चावर एक प्रभावी उपाय म्हणून ईव्हीचा पर्याय चांगला आहे. गेल्या वर्षभरात ई-वाहनांच्या नोंदणीत तिप्पट वाढ झाली आहे. ई-वाहनांच्या खरेदीवर सबसिडी आणि पायाभूत सोयी देण्याचे ठरले आहे. शहरात पुरेसी चार्जिंग स्टेशन्सचे जाळे उभारण्याची गरज आहे. 
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक अधिकारी पुणे

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रॉनिक गाड्या सध्या सोयीस्कर वाटतात, फक्त चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्यामुळे कमी प्रमाणात त्याचा वापर करावा लागतो. चार्जिंगच्या गाडीमुळे पेट्रोलवर होणारा अधिकचा खर्च वाचू शकतो. यासाठी ई-वाहनांना प्राधान्य द्यावे.
- प्रतीक कांबळे, ईव्ही चालक 

Web Title : ई-वाहन: क्या इलेक्ट्रिक वाहन पुणेकरों के लिए एक व्यवहार्य विकल्प होगा?

Web Summary : पुणे में ईवी अपनाने में बाधाएँ: उच्च लागत, चार्जिंग की कमी, सुरक्षा चिंताएँ। बिक्री और सरकारी पहलों में वृद्धि के बावजूद, सामर्थ्य और बुनियादी ढांचे की कमियाँ ईवी के व्यापक उपयोग के लिए प्रमुख चुनौतियाँ बनी हुई हैं।

Web Title : E-Vehicles: Will electric vehicles be a viable option for Punekars?

Web Summary : Pune faces EV adoption hurdles: high costs, charging scarcity, safety concerns. Despite increased sales and government initiatives, affordability and infrastructure gaps remain key challenges for widespread EV usage.