मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:18 IST2026-05-13T12:17:13+5:302026-05-13T12:18:04+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला उन्हाळी सुट्टीदरम्यान पाच दिवस मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.

मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम
मुंबई : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने आपल्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटू न देण्याच्या भूमिकेबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पती-पत्नीमध्ये कितीही मतभेद असले तरी मुलाला दोन्ही पालकांचे प्रेम मिळाले पाहिजे, असे न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिलेल्या आदेशात म्हटले.
न्यायालय एका व्यक्तीने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करत होते. त्या व्यक्तीने उन्हाळी सुट्टीत आपल्या अल्पवयीन मुलाला भेटण्याची परवानगी मागितली होती.
उच्च न्यायालयाने महिलेला उन्हाळी सुट्टीदरम्यान पाच दिवस मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश दिले. अर्जदार पतीने आपल्या याचिकेत म्हटले होते की, कुटुंब न्यायालयासमोर पत्नीने सुट्टीत मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, नंतर तिने नकार दिला आणि ठरल्याप्रमाणे आठवड्याच्या शेवटी मुलाला भेटू देणेही बंद केले.
आईमध्ये ‘मालकीभाव’
यावेळी उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलाचा ताबा असलेल्या आईमध्ये आता ‘मालकीभाव’ दिसून येतो. तसेच या मुलाला समुपदेशनासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवण्यात आल्याचे न्यायालयाला यावेळी सांगण्यात आले.
पालकांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची
खंडपीठाने म्हटले की, ही बाब ‘चिंताजनक’ आहे. जर मुलाला दोन्ही पालकांचा सहवास मिळाला असता, तर कदाचित त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवण्याची गरज पडली नसती.
मुलाच्या आयुष्यात दोन्ही पालकांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुलाचा सर्वांगीण आणि निरोगी विकास होण्यास मदत होते, असे न्यायालयाने म्हटले. सध्या आठ वर्षांचा असलेला हा मुलगा विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे.
अशावेळी जर आई त्याच्या मनात वडिलांसोबत राहणे चांगले नाही अशी भावना निर्माण करत असेल, तर तो भीतीचा भाव मुलाच्या मनात कायम राहू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालय काय म्हणाले?
पालकांमध्ये कितीही मतभेद असले तरी मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळाले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. महिलेने कुटुंब न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार दर आठवड्याच्या शेवटी मुलाला वडिलांना भेटू देण्याचे मान्य केले होते. मात्र, ती त्याचे पालन करत नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘ती (आई) जितका या व्यवस्थेला विरोध करेल, तितका मुलगा वडिलांपासून दूर जाईल आणि नेमके हेच आम्हाला टाळायचे आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.