Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:03 IST2026-05-13T12:00:07+5:302026-05-13T12:03:51+5:30
Prateek Yadav Aparna Yadav Love Story : प्रतीक आणि अपर्णा यांची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच होती.

Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक चर्चित नाव म्हणजे अपर्णा यादव. मात्र, आज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा आधारवड हरपला आहे. पती प्रतीक यादव यांच्या अकाली निधनामुळे त्यांची १० वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतरची सुखी संसारगाथा अधुरी राहिली आहे. प्रतीक आणि अपर्णा यांची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच होती. शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास लग्नाच्या बेडीपर्यंत कसा पोहोचला, हा किस्सा आजही अनेकांसाठी कौतुकाचा विषय आहे.
मैत्री शाळेत, पण ई-मेलने जुळवलं नातं
प्रतीक आणि अपर्णा हे दोघेही लखनौमधील एकाच शाळेत शिकत होते. एकाच वर्गात असूनही त्यांच्यात कधीही फारसे बोलणे किंवा भेट झाली नव्हती. मात्र, नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच आखून ठेवलं होतं. एका कॉमन मित्राच्या पार्टीत दोघांची भेट झाली आणि तिथे पहिल्यांदा त्यांच्यात मैत्रीपूर्ण संवाद झाला. यावेळी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर नाही, तर ई-मेल आयडी शेअर केले.
२००१ पासून ई-मेलचा सिलसिला
२००१ च्या सुमारास दोघांमध्ये ई-मेलद्वारे संवादाला सुरुवात झाली. सुरुवातीला अपर्णा रोज ई-मेल चेक करत नसत, पण हळूहळू प्रतीक यांच्या मेसेजना त्यांनी उत्तरं देण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सुमारे १० वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांचे स्वभाव आणि विचार पटल्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली.
शाही विवाह आणि बड्या हस्तींची हजेरी
४ डिसेंबर २०११ रोजी प्रतीक आणि अपर्णा विवाहबंधनात अडकले. मुलायम सिंह यादव यांनी आपल्या धाकट्या लेकाचं लग्न अत्यंत शाही थाटात लावून दिलं होतं. लखनौ आणि सैफई येथे झालेल्या या सोहळ्याला अमिताभ बच्चन, जया बच्चन, अनिल अंबानी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या दांपत्याला दोन मुलं आहेत.
राजकारण विरुद्ध रियल इस्टेट
प्रतीक यादव यांना राजकारणापेक्षा जिम, फिटनेस आणि रियल इस्टेटमध्ये जास्त रस होता. तर दुसरीकडे, अपर्णा यांना राजकारणाची आवड होती. मुलायम सिंह यादव यांनीच अपर्णा यांना २०१७ मध्ये लखनौ कँटमधून समाजवादी पक्षाची उमेदवारी दिली होती. मात्र, नंतरच्या काळात अपर्णा यांचा कल भाजपकडे वाढला आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.