पुणे तिथे औषधे उणे...रुग्णांचे हाल; मनपा दवाखान्यात औषधांचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:56 IST2025-03-26T10:56:41+5:302025-03-26T10:56:53+5:30
महापालिका आरोग्य विभागाच्या औषध भांडारात साठा संपत आल्याने गरजू रुग्णांना औषधांशिवाय परतावे लागते

पुणे तिथे औषधे उणे...रुग्णांचे हाल; मनपा दवाखान्यात औषधांचा तुटवडा
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना सध्या औषधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून महापालिका आरोग्य विभागाच्या औषध भांडारात साठा संपत आल्याने गरजू रुग्णांना औषधांशिवाय परत जावे लागत असल्याचे चित्र महापालिकेच्या दवाखान्यात आहे.
विनाकारण उन्हात रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आर्थिक क्षमता नसतानाही बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. शहरी गरीब योजनेअंतर्गत एक लाखाहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत किमतीचे उपचार मोफत दिले जातात. महापालिकेच्या रुग्णालयात गोळ्या आणण्यासाठी रुग्ण गेल्यानंतर त्यांना सहा गोळ्यांपैकी फक्त केवळ दोनच गोळ्या मिळत आहेत. यामुळे वाढत्या अधिकच्या गोळ्यांसाठी महागाईत गरीब रुग्णांनी जायचे कोठे?, औषध कोठून घ्यायचे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.
दरवर्षी सुमारे २१ हजार कुटुंबाना शहरी गरीब योजनेच्या लाभार्थी कुटुंबांतील व्यक्तींना या योजनेचा उपयोग होतो, मात्र सीएचएस (केंद्रीय सरकारी स्वास्थ योजना) ही योजना केवळ आजी-माजी कर्मचाऱ्यांपुरतीच असल्याने त्या योजनेला अधिक प्राधान्याने गोळ्या दिल्या जातात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक तुटवडा भासत नाही. सामान्य नागरिकांना मात्र प्राधान्य नसल्याने औषध भांडारातील तुटवड्याचा आर्थिक फटका बसत आहे. महापालिकेचे दोन मोठी रुग्णालये, ५२ दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये दररोज उपचारांसाठी येणाऱ्या १० हजार बाह्यरुग्णांना या औषधांचा उपयोग होत असतो, मात्र येथेही तुटवडा जाणवत आहे. याबाबत मनपा सहायक आरोग्य प्रमुख डॉ. राजीव वावरे यांना संपर्क केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शंकराव पोटे दवाखान्यात औषधाचा तुटवडा सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील महापिलकेचा मुख्य असणाऱ्या कै. शंकरराव पोटे दवाखान्यात दररोज ३०० रुग्णांची तपासणी होते. यामध्ये शहरी गरीब सह सीएचएस रुग्णांना औषध पुरवठा केला जातो. यामध्ये शेकडो रुग्णांना रोज कमी गोळ्या घेऊन जे मिळते त्यावर समाधान व्यक्त करावे लागत आहे. यामध्ये मूत्रविकार, मधूमेह, क्षयरोग अशा गंभीर रुग्णांनाही पुरेशा गोळ्या दिल्या जात नाहीत.
फार्मसिस्ट म्हणतात...
आम्ही रोजच्या रोज गाडीखाना दवाखान्यात औषधांची लिस्ट पाठवत असतो, तेथे जितकी औषधे उपलब्ध आहेत तितक्याच औषधांचा पुरवठा होतो, त्यामुळे आम्ही तरी जादा औषधे कोठून आणायची अशी खंत फार्मसिस्ट यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर व्यक्त केली.
पर्वती दर्शन परिसरातील राजामाता जिजाऊ प्रसूतीगृह व बाळासाहेब ठाकरे दवाखाना येथे सुविधांचा अभाव आहे. रेबीज इंजेक्शन मिळत नाही. यासाठी नागरिकांना आंबील ओढा येथील दवाखान्यात पाठवले जाते. तेथे इंजेक्शन नसले की, तेथून पुन्हा कमला नेहरू येथे पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांची अक्षरश: पळापळ होते आणि वेळेत औषधोपचार होत नाही. - रामदास गाडे, रुग्ण
माझ्या आई-वडिलांसाठी दर महिन्याला औषधे घ्यावी लागतात. आमच्याकडे शहरी गरीब योजनेचे कार्ड आहे, तरीही औषधांसाठी स्थानिक दवाखाण्यात हेलपाटे मारावे लागतात, तरी औषधे मिळत नाहीत. त्यावेळी आम्ही स्वत:च गाडीखाना दवाखान्यात जाऊन स्वत: च औषधे आणतो, पण तेथेही केवळ २-३ गोळ्याच मिळतात. - कोमल शिंदे, रुग्णांचे नातेवाईक, महर्षीनगर