पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि मारहाण केल्याप्रकरणी संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे आळंदी म्हातोबाची येथे प्रवचन कार्यक्रम आटोपून चारचाकी वाहनातून पुण्याच्या दिशेने निघाले होते. आळंदी म्हातोबाची गावातून बाहेर पडताच बलेनो आणि हायरायडर या गाड्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडी अडवली. त्यानंतर गाडीतून उतरलेल्या दोघांनी हातात पिस्टल दाखवत लवांडे यांना जबरदस्तीने वाहनाबाहेर ओढले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या १० ते १२ जणांनी विकास लवांडे आणि त्यांच्या चालकाला मारहाण केली. या मारहाणीत संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन सहभागी असल्याचे लवांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी लवांडे यांना जवळील स्मशानभूमीकडे ओढत नेले. त्या ठिकाणी एका व्यक्तीने हातातील पिस्टलचा धाक दाखवला, तर दुसऱ्या व्यक्तीने कमरेला असलेले पिस्टल दाखवत धमकी दिली. त्यानंतर संग्राम भंडारे पुढे येत लवांडे यांच्या अंगावर शाई फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“तू आमच्या गुरूंविरोधात का बोलला? याच पिस्तूलने तुला संपवून टाकू… आमच्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणार,” अशी धमकी देत आरोपींनी मारहाण सुरूच ठेवली, असेही लवांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, घटनास्थळी सुरू असलेला गोंधळ पाहून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिकांची गर्दी वाढू लागल्याचे पाहताच आरोपी घटनास्थळावरून वाहनांतून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), १८९(२), १९२(२), १९०, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.
Web Summary : NCP's Vikas Lavande was attacked with ink and threatened with pistols near Pune. Police have registered a case against 10-12 individuals, including Sangram Bhandare and Akshay Kanchan, for assault and intimidation. The incident, stemming from alleged remarks against a guru, is under investigation.
Web Summary : पुणे के पास एनसीपी के विकास लवांडे पर स्याही से हमला और पिस्तौल से धमकी दी गई। पुलिस ने संग्राम भंडारे और अक्षय कांचन सहित 10-12 लोगों के खिलाफ मारपीट और धमकी देने का मामला दर्ज किया है। कथित तौर पर एक गुरु के खिलाफ टिप्पणी के कारण हुई इस घटना की जांच चल रही है।