मंडप गोडाऊनला भीषण आग, सिलेंडर स्फोटांनी परिसर हादरला;मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:21 IST2026-05-12T15:20:47+5:302026-05-12T15:21:18+5:30
बिबवेवाडी अप्पर डेपोसमोरील घटना; दोन सिलेंडरचा स्फोट, सात ते आठ सिलेंडर जवानांनी सुरक्षित बाहेर काढले

मंडप गोडाऊनला भीषण आग, सिलेंडर स्फोटांनी परिसर हादरला;मोठा अनर्थ टळला
धनकवडी/ बिबवेवाडी : अप्पर डेपोसमोर असलेल्या काळे मंडप यांच्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीदरम्यान झालेल्या दोन सिलेंडर स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत चार अग्निशमन बंब आणि दोन पाण्याचे टँकर रवाना केले. आग वेगाने पसरत असल्याने अतिरिक्त पाण्यासाठी खाजगी टँकरचीही मदत घेण्यात आली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मंडप साहित्य आणि सिलेंडर साठवलेले असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती.
दरम्यान, आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाला आणि परिसर अक्षरशः हादरला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत गोडाऊनमध्ये प्रवेश केला आणि आणखी सात ते आठ सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यवर्ती अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी विजय भिलारे, कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाचे प्रमुख समीर शेख, कोंढवा खुर्द अग्निशमन दलाचे प्रमुख कैलास शिंदे आणि गंगाधाम अग्निशमन दलाचे प्रमुख सुमित नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या अथक मेहनतीनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या भीषण आगीत एक टेम्पो आणि चार ते पाच दुचाकी जळून खाक झाल्या असून मंडप साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.