‘बालभारती’ची पुस्तके अशी बनवा की मुलांना मोबाइल नको वाटेल - शिक्षणमंत्री दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:05 IST2025-08-22T18:03:24+5:302025-08-22T18:05:32+5:30
- मोबाइलवरील कार्टून दाखवल्याशिवाय जेवण जात नाही मुले मोबाइल बाजूला ठेवून आनंदाने पुस्तके वाचतील

‘बालभारती’ची पुस्तके अशी बनवा की मुलांना मोबाइल नको वाटेल - शिक्षणमंत्री दादा भुसे
पुणे : ‘आज मोबाइल, टीव्ही, ‘एआय’सारख्या आधुनिक माध्यमांच्या आकर्षणामुळे मुलांची नाळ आपल्या संस्कृतीशी आणि मातीतील मूल्यांशी तुटत चालली आहे. अगदी अडीच-तीन वर्षांच्या मुलालाही जेवण करताना मोबाइलवरील कार्टून दाखवल्याशिवाय जेवण जात नाही. हीच स्थिती बदलायची आहे, अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. तसेच बालभारतीने अशी पुस्तके निर्माण केली पाहिजे, की मुले मोबाइल बाजूला ठेवून ती आनंदाने वाचतील,’ असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २२) भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, ‘एनसीआरटी’चे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक, सुकाणू समितीचे सदस्य श्रीपाद ढेकणे तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष, लेखक व शैक्षणिक तज्ज्ञ उपस्थित होते.
भुसे म्हणाले, ‘आपले शिक्षण केवळ भाकरीपुरते मर्यादित न राहता ते राष्ट्रीय जबाबदारीचे असले पाहिजे. उद्याचा नागरिक हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकला पाहिजे, तसेच तो राष्ट्रहिताचा विचार करणारा घडला पाहिजे. यासाठी शाळेत असतानाच त्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देणे ही शिक्षक-लेखकांची जबाबदारी आहे. नवीन पुस्तकाच्या माध्यमातून जीवन जगण्याची प्रेरणा पुढील पिढी घडवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक म्हणाल्या, ‘बालभारतीच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या म्हणजे पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन करणे या होत. आतापर्यंत बालभारतीने वेळोवेळी अभ्यासक्रमाच्या बदलांनुसार पुस्तके तयार केली आहेत. यावेळी मात्र मोठं आव्हान आहे. एका वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची चार पाठ्यपुस्तके बदलायची आहेत. हे काम आपण सगळ्यांनी एकत्रितपणे नीट पार पाडू, असा विश्वास आहे.
‘एनसीआरटी’चे संचालक राहुल रेखावार म्हणाले, ‘आतापर्यंत महाराष्ट्राने अनेक वेळा पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत; पण या वेळची पुस्तकं मात्र वेगळी असतील; कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार फक्त पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, वेगवेगळ्या पातळ्यांवर शिकता यावं यावर भर आहे. त्यामुळे या वेळची पाठ्यपुस्तके नावीन्यपूर्ण असणे आवश्यक आहे.’