माहूरमध्ये शेतकऱ्याच्या विद्युत पंपाची चोरी; ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाइकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:06 IST2025-10-04T19:05:48+5:302025-10-04T19:06:40+5:30
या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिस तपास सुरू आहे.

माहूरमध्ये शेतकऱ्याच्या विद्युत पंपाची चोरी; ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाइकांना अटक
सासवड : माहूर (ता. पुरंदर) शेतकऱ्याच्या विहिरीतील कृषिपंप चोरून विक्री करणाऱ्या दोघांना सासवड पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी चोरलेली मोटार शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार माहूर ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडून आढळून आली. या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिस तपास सुरू आहे.
शेतकरी रोहिदास लक्ष्मण जगताप (वय ४५, रा. माहूर) यांच्या शेतजमिनीतील (गट क्र. ९२२) विहिरीतून १६ सप्टेंबर रोजी विद्युत पंपाची चोरी झाली. बाजरीच्या पिकाला पाणी घालण्यासाठी विहिरीवर गेल्यावर पाइप कापलेले, मोटर बांधलेला दोर तोडलेला असल्याचे रोहिदास यांना आढळले. परिसराची तपासणी केली, तरी कोणताही पुरावा मिळाला नाही. दरम्यान, शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रोहिदास हे कामाच्या निमित्ताने मांढर (ता. पुरंदर) येथील अजित गणपतराव शिर्के यांच्या घरी गेले. तेथे त्यांच्या घरात चोरलेली मोटर पडलेली दिसली. शिर्के यांना मोटरबाबत विचारल्यावर, ‘संदीप लक्ष्मण चव्हाण (वय ३०, रा. माहूर) यांनी मला वापरण्यासाठी दिली,’ असे ते म्हणाले. रोहिदास यांनी संदीप चव्हाण यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी, ‘साहिल सोमनाथ खोमणे (वय २५, रा. माहूर) यांनी मला मोटर दिली,’ असे सांगितले. या संगनमताने केलेल्या चोरीची खात्री पटल्यानंतर रोहिदास यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल जाधव व संदीप पवार यांनी तत्काळ कारवाई करून संदीप चव्हाण व साहिल खोमणे या दोघांना अटक केली.