पाण्याची पातळी पाहताना तोल गेला; विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:53 IST2026-04-28T11:52:59+5:302026-04-28T11:53:22+5:30
विहिरीतील पाण्याची पातळी व वीजपंपाची स्थिती पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. यावेळी अचानक पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले.

पाण्याची पातळी पाहताना तोल गेला; विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
रांजणगाव सांडस (पुणे जि. ) : शिरूर तालुक्यातील उरळगाव व परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर एका तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २७) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विशाल गेनभाऊ होलगुंडे (वय २६, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्यांचे चुलते भानुदास आप्पा होलगुंडे (वय ५५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल होलगुंडे हे नेहमीप्रमाणे सकाळपासून शेतात काम करत होते. दरम्यान, विहिरीतील पाण्याची पातळी व वीजपंपाची स्थिती पाहण्यासाठी ते विहिरीजवळ गेले. यावेळी अचानक पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. पोहता न आल्याने किंवा अपघाताच्या धक्क्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी त्यांची आई अलका होलगुंडे यांनी विहिरीत पाहिले असता विशाल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करून मदत मागितली. त्यांचा आवाज ऐकून जवळच शेतात काम करणारे भानुदास होलगुंडे व इतर शेतकरी घटनास्थळी धावून आले. स्थानिकांच्या मदतीने विशाल यांना बाहेर काढून तातडीने न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक पवार करीत आहेत.
दुष्काळाची झळ अधिक तीव्र
उरळगाव व पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, शेतकरी उरलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी धडपड करत आहेत. अशा परिस्थितीत विहिरीतील पाणी तपासण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने दुष्काळाची झळ किती तीव्र आहे, याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.