‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:35 IST2026-04-28T15:35:23+5:302026-04-28T15:35:36+5:30
स्थानबद्ध कार्यकर्त्यांची बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यातच सभा

‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
बुलढाणा : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वाचनाच्या प्रस्तावित कार्यक्रमावरून मंगळवारी बुलढाण्यात तणाव निर्माण झाला. आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर वाचन करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कारणास्तव पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना रोखले. या कारवाईवरून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दडपशाहीचे आरोप केले. आंदोलनकर्त्यांना अक्षरश: फरफरट पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले होते.
प्रकाशक प्रशांत आंबी यांना सकाळी चिखली येथे त्यांच्या सहकाऱ्यासह पोलिसांनी स्थानबद्ध करून चिखली पोलिस ठाण्यात नेले. मात्र त्यापूर्वी प्रशांत आंबी यांनी चिखली शहरातील चौफुलीवरच पुस्ताकाचे वाचन सुरू केले होते. दुसरीकडे, राज्यातील सुमारे २८ जिल्ह्यांतून आलेले कार्यकर्ते बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागृह येथे जमा झाले होते. तेथे ते प्रशांत आंबी यांची वाट पहात होते. दरम्यान आंबींना स्थानबद्ध केल्यानंतर पोलिसांचा मोर्चा जिजामाता प्रेक्षागारकडे वळला. या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप व पिण्याच्या पाण्याच्या कॅन नंतर हटविण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हे साहित्य कोणत्या दबावाखाली काढण्यात आले, याबाबत स्पष्टता मिळालेली नाही.
चिखली शहरातील चौफुलीवर पुस्तकाचे वाचण करतांना प्रशांत अंबी व सहकारी.

दरम्यान, जिजामाता प्रेक्षागृहात आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी सुरू झाली. आंदोलनकर्त्यांनी ‘आ. गायकवाड मुर्दाबाद’ तसेच पोलिसांच्या कारवाईविरोधात आंदोलकांनीही घोषणाबाजी केली, तर गायकवाड समर्थकांनीही प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर काही काळ तणाव वाढल्याचे दिसून आले.
आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अपर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपअधीक्षक सुधीर पाटील आदी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. “शांततेत वाचन करून नियमांचे पालन करा,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. परंतू पोलिस बळाने हे आंदोलन चिरडण्यात आले.
दबावात मंडप व पाण्याच्या कॅन हटविल्या
या गोंधळात नागपूरवरून आलेल्या एका कार्यकर्त्याने मंडप हटविण्यामागे दबाव असल्याचा आरोप केला. तसेच झटापटीदरम्यान मोनिका नावाच्या एका आंदोलनकर्तीचा हात दुखावला गेल्याची घटना घडली. तिला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, उन्हाचा पारा ४३ अंशांवर पोहोचलेला असतानाही महिला व तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
पाणी व सावलीची सुविधा हटविण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. या आंदोलनात कॉ. गोविंद पानसरे यांची मुलगी कॉम्रेड स्मीता पानसरे, तुकाराम भस्मे, राज्य सचिव सुभाष लांडे, अजित नवले, राम बाहेती, चव्हाण, डॉ. युगल रायलू, राजू देसले, सी. एम. देशमुख, एम. एस. जाधव, अनिल गायकवाड, जितेंद्र चोपडे आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी “पुस्तक वाचन हा गुन्हा आहे का?” असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.