पुण्यात टँकरचा काळाबाजार सुरूच; पाण्याच्या टँकरची चौपट दराने विक्री

By राजू हिंगे | Updated: April 29, 2026 11:07 IST2026-04-29T11:06:26+5:302026-04-29T11:07:21+5:30

महापालिका टँकर भरणा केंद्रावर महापालिकेचे स्वत:चे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी असे तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात.

pune news black market in tankers continues; sold at three to four times the price | पुण्यात टँकरचा काळाबाजार सुरूच; पाण्याच्या टँकरची चौपट दराने विक्री

पुण्यात टँकरचा काळाबाजार सुरूच; पाण्याच्या टँकरची चौपट दराने विक्री

पुणे : एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे टँकरचालकांनी टँकरच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या गरजेप्रमाणे दररोज टँकरचे दर वाढत असून, प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी २ हजार रुपये, तर काही ठिकाणी अडीच हजार, तीन हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. टँकरचा काळाबाजार सुरूच असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत.

महापालिका टँकर भरणा केंद्रावर महापालिकेचे स्वत:चे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले आणि खासगी असे तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. महापालिकेच्या तसेच खासगी टँकरचीही मागणी वाढली आहे. पुणे महापालिकेच्या मालकीचे २९ टँकर आहे. पालिकेच्या टँकर पाॅइंटवरून टँकर भरणारे खासगी टँकरधारकाची संख्या ४५ आहे. पालिका ज्या भागाला नळाद्वारे पाणीपुरवठा करत नाही. त्या भागाला ठेकेदारी पद्धतीने निविदा काढून खासगी टँकरधारकांमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

पालिकेच्या टँकर पाॅइंटवर दररोज १ हजार ६५० टँकर भरून जातात. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये वाट्टेल त्या दराने टँकरचालक पाणी देत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो.

साडेचाैदाशे रुपयांच्या टँकरसाठी अडीच हजार माेजावे लागतात. खासगी टँकरचालकांकडून महापालिका ७३४ ते १,६३० रुपयांदरम्यान शुल्क आकारते. प्रत्यक्षात नागरिकांना हा टँकर देताना ठेकेदार परिस्थितीनुसार पैसे आकारत असल्याची तक्रार केली जात आहे. एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा. इतर कोणत्याही ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जात असल्याने पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकरचा पुरवठा करणारा ठेकेदार मागेल तो दर द्यावा लागत आहे. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार २ हजार ते २,५०० रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.

पूर्व भागात मागणी जास्त

शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा, वाघोली, उंड्री, पिसोळी, बावधन बाणेर-बालेवाडी आदी अनेक उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकरभरणा केंद्रांवरून पाणी घेतात, तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. महापालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकर भरणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

..........

खासगी टँकरला मिळणारे दर

टँकर क्षमता - दर

१० हजार लिटरपर्यंत - ७३४ रुपये

१५ हजार लिटरपर्यंत - १,१५६ रुपये

२० हजार लिटरपेक्षा जास्त क्षमतेसाठी - १,६३० रुपये

........

नागरिकांसाठीच्या टँकरसाठी

पुणे महापालिका गेल्यावर्षी नागरिकांना दहा हजार लिटरपर्यंतचा टँकरसाठी आता १ हजार ३०३ रुपयांना मिळत आहे. पालिका हद्दीतील २३ गावे सोडून हे टँकर दिले जात आहेत. 

..........

महिना    -          टँकरची संख्या

फेब्रुवारी -             ४६,०६८

मार्च -            ५८,३४५ 
-----

पुणे महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर भरलेला टँकरचालक-मालक नागरिकांकडून जास्त पैसे घेत असेल, तर नागरिकांनी तक्रार करावी. त्यावर कारवाई केली जाईल.  - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका 

Web Title : पुणे: पानी के टैंकरों की कालाबाजारी जारी; कीमतें चार गुना बढ़ीं।

Web Summary : पुणे में तापमान बढ़ने के साथ पानी के टैंकरों की कीमतें बढ़ रही हैं। निजी ऑपरेटर मांग का फायदा उठाकर आधिकारिक दर से चार गुना तक शुल्क ले रहे हैं। पूर्वी पुणे के उपनगर सबसे अधिक प्रभावित हैं। नगर पालिका ने नागरिकों से अधिक शुल्क की रिपोर्ट करने का आग्रह किया है।

Web Title : Pune: Water tanker black market persists; prices soar fourfold.

Web Summary : As Pune faces rising temperatures, water tanker prices surge. Private operators exploit demand, charging up to four times the official rate. East Pune suburbs are most affected. The municipality urges citizens to report overcharging.