जुन्नरमध्ये २ टन गोमांस जप्त, ४ गायी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:42 IST2025-10-07T17:42:04+5:302025-10-07T17:42:40+5:30
सुमारे २ टन गोमांस आणि कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी जुन्नर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत जप्त

जुन्नरमध्ये २ टन गोमांस जप्त, ४ गायी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई
जुन्नर : जुन्नर शहरातील माई मोहल्ला येथील जैन मंदिराजवळील एका पत्रा शेडमध्ये गोवंशाची अवैध कत्तल करून विक्रीसाठी ठेवलेले सुमारे २ टन गोमांस आणि कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी जुन्नर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत जप्त केल्या.
या घटनेमुळे जुन्नर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ ते ५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियमासह भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींनी पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले आहे. पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप मोरे, अरविंद गटकुळ, हृषिकेश टिटमे, अमलदार कैलास केंद्रे, गणेश शिंदे, दादा पावडे, दीपक वनवे, राहुल सुरलसे, विलास लेंभे, समाधान ताडगे आणि आरसीपी पथकाने माई मोहल्ला येथे छापा टाकला. या कारवाईत २ टनांहून अधिक गोमांस आणि ४ जिवंत गायी ताब्यात घेण्यात आल्या. पोलिस अंमलदार श्रीराम शिंदे यांनी फिर्याद नोंदवली असून, सहायक फौजदार भगवान गिजरे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई जुन्नरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांस जप्तीची घटना असल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.