पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:48 IST2025-03-05T09:47:48+5:302025-03-05T09:48:05+5:30
सरळ मार्गामुळे या भागातील शेतीमालाची वाहतूक, औद्योगिक क्षेत्राची वाहतूक व पर्यटनाला चालना मिळणार

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय
घोडेगाव : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ ठरल्या मार्गानेच व्हावा या मागणीसाठी पुणे व नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची बैठक मुंबईमध्ये झाली. या बैठकीत विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय असल्याच्या मुद्द्यावर एकमत झाले.
या बैठकीस माजी मंत्री व आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार अमोल खताळ, सत्यजीत तांबे उपस्थित होते, तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. या आठवड्याात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय तातडीने चर्चेला घ्यावा, असा निर्णय झाला. तसेच या तिन्ही नेत्यांना सांगून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही लवकरच बैठक आयोजित करण्याचा ठरावदेखील करण्यात आला आहे.
शिर्डी ते अहिल्यानगर रेल्वेमार्गे अस्तित्वात आहे व अहिल्यानगर ते पुणे असादेखील रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे नाशिक - पुणे रेल्वेमार्ग कमी खर्चात होणार असल्याने रेल्वे विभागाकडून असा मार्ग करण्याच्या हलचाली सुरू आहे. खर्च वाचविण्यासाठी रेल्वे विभाग पर्याय पाहात आहेत, मात्र यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्र, आंबेगाव, जुन्नर, नाशिक जिल्ह्यातील शेतीमाल वाहतुकीस फायदा होणार नाही. त्यामुळे नवीन मार्गाला पुणे व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे.
हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व या मार्गामध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आणि नाशिक - पुणे प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि वेगवान होण्यासाठी तातडीने पावले उचलली जाण्यासाठी सगळे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील, असे या बैठकीत ठरले.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक
नाशिक - पुणे रेल्वेमार्ग हा नाशिकमार्गे शिर्डी, संगमनेर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकणमार्गे पुणे असा ठरल्याप्रमाणे झाला पाहिजे. या मार्गामुळे या भागातील शेतीमालाची वाहतूक, औद्योगिक क्षेत्राची वाहतूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे. असा मार्ग व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत बैठक घेतली जाईल, असे माजी मंत्री व आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.