पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस! आंबाला कांट जंक्शनपर्यंत धावणार, पुढच्या प्रवासासाठी दुसरा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:45 IST2025-09-02T16:42:19+5:302025-09-02T16:45:30+5:30
काही दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी रूळावर पाणी साचले आहे

पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस! आंबाला कांट जंक्शनपर्यंत धावणार, पुढच्या प्रवासासाठी दुसरा पर्याय
पुणे: जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रूळावर पाणी साचलेले आहे. रेल्वे प्रवास सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्यातून जम्मूपर्यंत जाणारी झेलम एक्स्प्रेस (दि. २ ते २९) सप्टेंबरपर्यंत आंबाला कांट जंक्शनपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुढील प्रवासासाठी प्रवाशांना दुसऱ्या पर्यायी वाहनांचा वापर करावा लागणार आहे.
पुणे स्थानकावरून धावणारी पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस ही पुणे विभागातील महत्त्वाची गाडी आहे. पुण्यातून थेट जम्मूमध्ये जाण्याची सोय असल्याने या गाडीला बारा महिने गर्दी असते. शिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली या शहराला थेट रेल्वे जोडत असल्याने पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु, गेले काही दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रूळावर पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत रुळावरून रेल्वे धावल्याने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे झेलम एक्स्प्रेस आंबाला कांट जंक्शनपर्यंत धावणार आहे. पुणे विभागातून सर्वांत लांब पल्ल्याची धावणारी झेलम एक्स्प्रेस उत्तर भारतासह थेट काश्मीरमध्ये जात असल्याने या गाडीला बाराही महिने प्रवाशांची गर्दी असते. परंतु पावसामुळे ही गाडी आता पुढे रद्द केल्यामुळे प्रवाशांना मनस्तापासह गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
वेळेवर अन् सुपरफास्ट
झेलम एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी पुणे विभागातून चालविण्यात येते. तीन दिवसांच्या प्रवासात ही गाडी २ हजार १७१ किमीचा प्रवास करते. शिवाय वेळेवर धावण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच पुण्यातून थेट दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे गाड्या कमी असल्याने या गाडीला कायम गर्दी असते. शिवाय अलीकडे या गाडीला नवीन एलएचबी कोच जोडल्याने आरामदायी प्रवास होतो. परंतु आता पुढील २८ दिवस या गाडीचा प्रवास आंबाला कांट जंक्शनपर्यंत हाेणार आहे. त्यामुळे तेथून पुढे जाण्यासाठी प्रवाशांना दुसऱ्या वाहनांची मदत घ्यावी लागणार आहे.