डिंभे धरणाची पातळी घसरली; मे महिन्यातच २१ टक्क्यांवर साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:07 IST2026-05-08T13:07:01+5:302026-05-08T13:07:15+5:30

Pune district water shortage : डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता.

Pune district water shortage Dimbhe dam level drops; stock at 21 percent in May itself | डिंभे धरणाची पातळी घसरली; मे महिन्यातच २१ टक्क्यांवर साठा

डिंभे धरणाची पातळी घसरली; मे महिन्यातच २१ टक्क्यांवर साठा

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पाटण खोऱ्यासाठी जीवनदायी ठरलेले डिंभे धरण यंदा उन्हाळ्याच्या झळांनी लवकरच आटू लागले आहे. दि. ७ मे रोजी हुतात्मा बाबू गेणू जलाशय अर्थात डिंभे धरणात केवळ २१.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाळ्यात भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे पाटण, म्हाळुंगे, कुशिरे (खुर्द व बुद्रुक), मेघोली, दिगद, बेंढारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी उपसा सिंचनाच्या माध्यमातून गहू, बाजरी, बटाटा, कांदा, मेथी, कोथिंबीर यांसारखी रब्बी पिके घेतली. मात्र, उन्हाळा तीव्र होताच पाण्याची पातळी झपाट्याने खाली आली आहे. 

या भागात पावसाळ्यात चार महिने मुसळधार पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात आदिवासी बांधवांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, टाक्या, बंधारे, तळी यांसारखे जलस्रोत पावसाळ्यानंतर पूर्णपणे कोरडे पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यंदा पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने आणि धरणातून कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने साठा झपाट्याने घटला आहे. 

सावरली, साकेरी, नानवडे, ढकेवाडी या गावांच्या जवळ धरण असूनही येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. “उशाला धरण आणि पाण्यासाठी भटकंती” अशी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title : डिंभे बांध का जलस्तर गिरा; मई में ही 21% स्टॉक

Web Summary : डिंभे बांध का जलस्तर मई में ही 21% तक गिर गया है। बांध के पास होने के बावजूद आदिवासी गांवों में पानी की भारी कमी है। तत्काल कार्रवाई की आवश्यकता है।

Web Title : Dimbe Dam Water Levels Drop; Stock at 21% in May

Web Summary : Dimbe Dam's water level is critically low at 21% in May. Tribal villages face severe water scarcity despite the dam's proximity. Urgent action is needed.