चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम करणारा तो ‘पाटील’ कोण ? धंगेकरांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:51 IST2025-10-05T11:50:16+5:302025-10-05T11:51:19+5:30
कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मौन बाळगणारे चंद्रकांत पाटील गौतमी प्रकरणात इतके सक्रिय का झाले? असा सवाल विचारला जात आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम करणारा तो ‘पाटील’ कोण ? धंगेकरांचे गंभीर आरोप
पुणे - भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील हे एका पोलीस उपायुक्तांना फोनवरून विचारताना दिसत आहेत “गौतमी पाटीलला कधी उचलायचं?” या व्हिडिओनंतर विरोधकांनी त्यांच्यावर तीव्र टीका सुरू केली आहे. विशेषतः कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मौन बाळगणारे चंद्रकांत पाटील गौतमी प्रकरणात इतके सक्रिय का झाले? असा सवाल विचारला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले, पाटील नावाचा व्यक्ती चंद्रकांत पाटील यांचे काम बघतो. तो त्यांच्या ऑफिसमध्ये सतत असतो. जर पोलिसांनी त्या व्यक्तीचा मोबाईल तपासला, त्याची कॉल डिटेल हिस्ट्री (CDR) काढली, तर सगळं सत्य बाहेर येईल. त्या ‘पाटील’चा गुंड निलेश घायवळ याच्याशी किती वेळा संवाद झाला, आणि तो संवाद चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत किती वेळा पोहोचला हे सर्व स्पष्ट होईल. धंगेकरांनी असा दावा केला की, “पोलिसांकडे पुरावे आहेत, पण सत्ता त्यांच्या हाती असल्यामुळे पोलीस काही कारवाई करत नाहीत.”
धंगेकर पुढे म्हणाले,“निलेश घायवळ एकटा काहीही करू शकत नाही. पोलिसांनी जर आज ठरवलं, तर त्याला नेस्तनाबूत करण्यात काही वेळ लागणार नाही. पण सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर अंकुश असल्यामुळे पोलिसांना कृती करता येत नाही. गौतमी पाटील प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपावरूनही धंगेकरांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून पोलीस उपायुक्तांना विचारण्यापेक्षा स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घ्यायला हवी होती, असे धंगेकर म्हणाले.