सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:43 IST2025-08-19T20:43:24+5:302025-08-19T20:43:49+5:30
बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली

सॉरी बोल, नाहीतर...; पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी
पुणे : कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने पुण्यातील फिटनेस ट्रेनरला ‘सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,’अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दिल्लीतील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
भास्कर शहा, नरेश चौधरी आणि करण (तिघेही रा. दिल्ली) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत धानोरी परिसरात फिटनेस ट्रेनरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५१ (२), ३५२ व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सध्या धानोरी परिसरात राहण्यास असून, ते मुळचे हरियाणामधील आहेत.
ते गेली सहा वर्षे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसचे ऑनलाइन ट्रेनिंग देतात. यासाठी त्यांच्या नावाने इन्स्टाग्राम, यू ट्यूब व फेसबुकवर अकाउट आहे. याच माध्यमातून त्यांची आरोपी भास्कर शहा याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ६ जून २०२५ रोजी फिर्यादींना नरेश चौधरी नावाच्या आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर फिर्यादींनी त्यांची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने भास्कर शहा आणि करण यांच्यासोबत दिल्लीत पेइंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे सांगितले. तसेच, भास्कर शहा आणि करण हे दारू पिऊन त्रास देत असल्याचे व्हिडीओ फिर्यादीच्या इन्स्टाला व स्वतःच्या इन्स्टाला पोस्ट केले. दि. ८ जून रोजी नरेश आणि करण यांनी त्यांच्या इन्स्टावरील पोस्ट डिलीट केली. नंतर फिर्यादींना त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. परंतु, त्यांनी ती पोस्ट डिलीट केली नाही.
त्यानंतर भास्कर शहा, करण व नरेश हे वारंवार फोनद्वारे धमकी देत होते. त्यानंतर ९ जून रोजी व्हॉट्सअॅप नंबरवरून त्यांना बिष्णोई गँगमधून बोलत असल्याचा कॉल आला व तो व्हिडीओ तत्काळ काढून टाक म्हणत शिवीगाळ केली. दरम्यान, दि. २ जुलै रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून मी लॉरेन्स बिष्णोई गँगमधून काला शूटर बोलत आहे, असे म्हणत भास्कर शहाला 'सॉरी बोल, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकू,' अशी धमकी दिली. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.