पुण्यात सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले चोर; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:30 IST2025-08-23T20:29:41+5:302025-08-23T20:30:28+5:30
गुन्ह्याचा छडा लावताना संशय सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर गेला.

पुण्यात सोसायटीचेच सुरक्षा रक्षक ठरले चोर; ८,६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला
पुणे - सिंहगड रोड परिसरातील ओमसाई सोसायटीतून तब्बल ८ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी सोसायटीतील सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. पर्वती पोलीसांनी जलदगतीने तपास करून अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान फिर्यादी यांनी आपले फ्लॅट बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून ९ तोळे सोन्याचे दागिने व रोख मिळून एकूण ८,६५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. घटनेनंतर फिर्यादींनी परवती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. गुन्हा भारतीय दंड संहिता कलम ४५४, ३८०, ३३९(२), ३३९(४) अंतर्गत दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा छडा लावताना संशय सोसायटीतील सुरक्षा रक्षकावर गेला.अखेर आरोपीचे नाव रोशनकुमार बुधनाथ सोनू (वय २९, रा. ओमसाई सोसायटी, गणेशमाळ, सिंहगड रोड, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे समोर आले. आरोपी सुरक्षारक्षक असून, त्याने विश्वासघात करूनच चोरी केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीकडून ९ तोळे सोन्याचे दागिने व रोख मिळून एकूण ८,६५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई परवती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने केली.