एनडीएतील प्रशिक्षणार्थी कॅडेटचा मृत्यू; न्यायालयीन चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:32 IST2025-10-11T09:31:20+5:302025-10-11T09:32:24+5:30
- प्रशिक्षणासाठी हजर न झाल्याने सहकारी कॅडेट्सनी शोध घेतला असता तो आपल्या केबिनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

एनडीएतील प्रशिक्षणार्थी कॅडेटचा मृत्यू; न्यायालयीन चौकशीचे आदेश
पुणे : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), खडकवासला येथील कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चार्ली (सी) स्क्वॉड्रनमध्ये नियुक्त असलेला प्रशिक्षणार्थी कॅडेट अंतरिक्षकुमार सिंह (वय १८) हा आपल्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळला. याबाबत चौकशी न्यायालयाची नियुक्त करण्यात आली असून, त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
अंतरिक्षकुमार सिंह हा मूळ उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी असून, त्याची निवड अकादमीच्या १५४ व्या कोर्ससाठी झाली होती. जुलै २०२५ पासून त्याने प्रशिक्षणास सुरुवात केली. शुक्रवारी (दि.१०) सकाळी प्रशिक्षणासाठी हजर न झाल्याने सहकारी कॅडेट्सनी शोध घेतला असता तो आपल्या केबिनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तत्काळ त्याला मिलिटरी हॉस्पिटल, खडकवासला येथे हलविण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला सकाळी साडेसहाच्या सुमारास मृत घोषित केले.
दरम्यान, एनडीएकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), खडकवासला येथे शुक्रवारी (दि.१०) पहिल्या वर्षाचे प्रशिक्षण घेत असलेल्या कॅडेट अंतरिक्षकुमार सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल अकादमीला अत्यंत खेद वाटत आहे. .याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
राष्ट्रीयसंरक्षण प्रबोधिनीतील छात्राच्या मृत्यू प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. या प्रकरणाची लष्करी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. - संभाजी कदम, पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन