मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या;आईसह मुलीला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 20:16 IST2025-10-04T20:15:34+5:302025-10-04T20:16:14+5:30
- तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या चप्पल व बूट हस्तगत झाले.

मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या;आईसह मुलीला पोलिसांनी केली अटक
पुणे : ज्वेलरी खरेदीच्या बहाण्याने बनावट आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून चप्पल-बूट व दागिने लंपास करणाऱ्या आईसह तिच्या मुलीला लष्कर पोलिसांच्या पथकाने अटक केली. मिनाज मुर्तजा शेख (वय ४०, रा. बुर्ज अल मर्जाना सोसायटी, कोंढवा) आणि तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (१९) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. आरोपी माय-लेकीकडून तब्बल ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लष्कर पोलिस ठाण्यात आझम इक्रराब शेख (रा. भवानी पेठ, पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांचे कलीज नावाचे चप्पल दुकान एम. जी. रोड कॅम्प येथे आहे. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरोपी माय-लेक त्यांच्या दुकानात आल्या. मिनाज शेख हिने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बूट खरेदी करून कामगाराला ‘पैसे देण्यासाठी कमिशनर ऑफिसला चल’ असे सांगितले. मात्र, पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या. या प्रकरणाचा तपास महिला उपनिरीक्षक स्वाती भराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लोकेश कदम व अमोल कोडीलकर हे करत होते. एम. जी. रोड परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींचा ठावठिकाणा मिळवण्यात आला. अखेर १ व २ ऑक्टोबर रोजी दोघींना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या चप्पल व बूट हस्तगत झाले. याशिवाय कॅम्प परिसरातील मचमोर या दुकानातून चोरीला गेलेली काही इमिटेशन ज्वेलरीही जप्त करण्यात आली आहे. लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाज शेख व रिबा शेख यांच्या विरोधात यापूर्वीही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगीता अल्फान्सो, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पवार, पीएसआय स्वाती भराड यांच्यासह पथकाने केली.