Pune Crime: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:20 IST2026-01-07T14:19:38+5:302026-01-07T14:20:51+5:30
Pune Crime: एका १७ वर्षाच्या मुलाची हालहाल करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमध्ये चौघांनी मिळून अमनची हत्या केली.

Pune Crime: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला
कामावर जात असल्याचे सांगून अमन घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी आलाच नाही. बेपत्ता झालेल्या १७ वर्षाच्या अमनसिंगचा पोलिसांनी शोध सुरू केला. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. अमनसिंगची चार जणांनी हत्या केल्याचे समोर आले. त्याची हत्या करण्यासाठी आरोपींनी इन्स्टाग्रामची मदत घेतली आणि कात्रज घाटात बोलवून हत्या केली. अमनसिंगची दगड आणि कोयत्याने हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे हादरले.
अमनसिंग सुरेंद्रसिंग गच्चड असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी तो घरातून बाहेर पडला होता. घरीच न आल्याने आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
अमनसिंगची हत्या कोणी केली?
पोलिसांनी अमनसिंग हत्या प्रकरणात दोन तरुणांना अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चौघेही हत्या करून फरार झाले होते. बेळगावमधून प्रथमेश चिंदू अधळ (वय १९), नागेश बालाची ढबाले (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त मुलांचे वय १६ वर्षे आणि १७ वर्षे आहे.
जुन्या वादातून अमनसिंगची हत्या
अटक केलेल्या आरोपींनी मयत मुलावर आरोप केले आहेत. अमनसिंग हा खूप त्रास देत होता. जुन्या वादाचा बदला म्हणून त्याची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. आरोपींनी अमनची आधी हत्या केली. त्यानंतर पुरावा मिळू नये म्हणून त्याचा मृतदेह पुरला होता.
इन्स्टाग्रामवरून टाकलं प्रेमाचं जाळ
आरोपींनी अमनसिंगला धडा शिकवण्यासाठी इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या अकाऊंटवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अमनसिंग हा पेंटर म्हणून काम करत होता. आरोपींनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याला मेसेज पाठवण्यास सुरू केली. त्याच्याशी ते मुलीच्या अकाऊंटवरून बोलत होते.
आरोपींनी त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला भेटण्यासाठी बोलावलं. कात्रज घाटात ये असा मेसेज त्याला पाठवला. त्यानंतर २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता तो भेटण्यासाठी घरातून बाहेर पडला. कामावर चाललोय असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता.
आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी अमन पोहोचला. तिथे चारही आरोपी आधीच हजर होते. त्यांनी अमनसिंगवर हल्ला केला. तो बेशुद्ध पडला. त्यानंतर ते त्याला खेड-शिवापूर शिवारात घेऊन गेले. तिथे त्याला दगडाने ठेचले आणि कोयत्याने वार करत हत्या केली. त्यानंतर तिथेच त्यांनी त्याला पुरले. पोलिसांनी सध्या ज्या मुलीच्या अकाऊंटचा वापर करण्यात आला आहे, तिचाही शोध घेत आहेत.
पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि अमनसिंगच्या हत्या प्रकरणाचा छडा लावला.