Pune crime : पुण्यात ॲपद्वारे चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १९ आरोपी अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:27 IST2026-04-28T11:26:23+5:302026-04-28T11:27:19+5:30

-एमडी बनवणाऱ्या राजस्थानातील कारखान्यावर कारवाईची तयारी; २३ दिवसांच्या गुप्त तपासानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Pune crime: Drug racket run through app busted 19 accused arrested, goods worth Rs 58 lakh seized | Pune crime : पुण्यात ॲपद्वारे चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १९ आरोपी अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune crime : पुण्यात ॲपद्वारे चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १९ आरोपी अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : मोबाइल नंबरशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे जाळे पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲपच्या माध्यमातून पेडलर आणि ग्राहक थेट संपर्कात राहात होते. तब्बल २३ दिवस गुप्त पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणाचे धागेदोरे आता राजस्थानपर्यंत पोहोचले असून, तेथे मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्यावर लवकरच कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईपूर्वी शहरातील सर्व पेडलर आणि ग्राहकांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. ड्रग्ज येते कुठून? आणि नेटवर्क कसे कार्य करते? याची सविस्तर माहिती गोळा केल्यानंतरच छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांनी २८९.१९ ग्रॅम मेफेड्रोन, ४२२ ग्रॅम गांजा आणि २६० ग्रॅम पावडर (ज्यात मेफेड्रोनचे अंश आढळले) असा एकूण सुमारे ५८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्यासह विमानतळ, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद आणि लोहगाव पोलिस ठाण्यांच्या पथकाने केली.

पोलिस तपासात, आरोपी सुरुवातीला व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे संपर्कात होते. मात्र, नंतर त्यांनी पद्धत बदलली. ते टेलिग्रामसह इतर ॲपच्या कॉलिंग सुविधेद्वारे संपर्क साधत होते. सिग्नल आणि जँगीसारख्या ॲपचा वापर केला जात होता. या ॲपमध्ये मोबाइल क्रमांकाची गरज नसून फक्त युजर आयडीद्वारे लॉगिन करून संवाद साधला जातो. त्यामुळे पोलिसांसाठी ट्रॅकिंग करणे कठीण झाले होते, अशी माहिती झोन ७चे उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण उच्चशिक्षित असून, चांगल्या कुटुंबातील आहेत. ते पदवीधर असून, नशेच्या आहारी गेल्यामुळे स्वतःही ड्रग्जचे सेवन करत होते आणि इतरांना विकून पैसे कमावत होते. तपासात हेदेखील समोर आले की, हे नेटवर्क राजस्थानशी जोडलेले आहे. आरोपींच्या चौकशीतून मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ राजस्थानमधून मागवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्स तयार करणारा कारखाना कार्यरत असून, पोलिसांनी त्याला रडारवर घेतले आहे. हा कारखाना लवकरच उद्ध्वस्त करण्याची योजना आखली जात आहे. तसेच अटक केलेल्या १९ आरोपींच्या संपर्कात असलेल्या इतरांचीही चौकशी सुरू आहे. या कारवाईदरम्यान ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी वापरली जाणारी एक कारही जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी आपले गैरकृत्य लपवण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या. मात्र, सातत्याने पाळत ठेवल्यामुळे संपूर्ण नेटवर्क उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले. ही मोहीम १ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवण्यात आली. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ परिसर, चंदननगर आणि खराडी या भागांत छापेमारी करण्यात आली. ड्रग्सची विक्री आणि सेवन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींची नावे...

प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय १९, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी), उबेद अन्सार खान (वय २७, रा. हडपसर), व्यंकटेश गंगाप्पा चव्हाण (वय १९, रा, वडगाव शेरी), सार्थक बलराज खंडाले (वय १९, रा. धन्वंतरी कॉलनी, वडगाव शेरी), अमित अपधेश यादव (वय २३, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी), सुमित संजय लांडगे (वय २५, रामवाडी वस्ती, रामवाडी), प्रवीण पुनमराम बिष्णोई (वय २२, रा. रामवाडी), योगेश कनगरे (वय ३८, रा. संभाजीनगर), नीलेश सदाशिव भोसले (वय ३६, हवेली), मनविंद्र शंकर सिंह (वय ४२, रा. टिंगरेनर), रमेश उदाराम सुतार (वय ३४, जालोर, राजस्थान), पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, बुलढाणा), भगीरथ सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८, रा. राजस्थान), आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९, रा. हवेली), योगेश लक्ष्मण चव्हाण (रा. शिरवळ, जि. सातारा), राजेंद्र केरू टेले (वय ३५, रा. पुणे ), करण सचिन मोहिते (वय २१, रा. शिरूर, पुणे), शबनम हानिफ शेख (वय ३४, रा. लोहगाव) यांच्यासह दोन अल्पवयीनांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

खराडी परिसरात मेफेड्रोनसंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली होती, ज्यात सुमारे ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यावरून शहरात ड्रग्जचे जाळे वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट झाले असून, आता पोलिसांकडून ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अमली पदार्थांविरोधात आम्ही अत्यंत जोरात कारवाई सुरू केली आहे. अमली पदार्थ विकणारे आणि विकत घेणाऱ्यांवर आमची अत्यंत बारकाईने नजर आहे. अमली पदार्थ विक्रीचे प्रकार दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

Web Title : पुणे: ऐप से चल रहे ड्रग रैकेट का भंडाफोड़, 19 गिरफ्तार, जब्ती

Web Summary : पुणे पुलिस ने ऐप-आधारित ड्रग रैकेट का पर्दाफाश किया, 19 गिरफ्तार। ₹58 लाख के ड्रग्स जब्त, राजस्थान कनेक्शन की पहचान; निर्माण संयंत्र को नष्ट करने की योजना।

Web Title : Pune Drug Racket Busted Via App; 19 Arrested, Seizures Made

Web Summary : Pune police dismantled an app-based drug racket, arresting 19. They seized ₹58 lakh worth of drugs and identified a Rajasthan connection, planning further action to destroy the manufacturing plant.