Pune Crime : २००२ चा खुनी, २०२६ मध्ये अटक; तंबाखूच्या वादातून खून करणाऱ्याला २४ वर्षांनी बेड्या

By किरण शिंदे | Updated: April 17, 2026 14:18 IST2026-04-17T14:17:34+5:302026-04-17T14:18:24+5:30

आरोपी रायगड जिल्ह्यातील वारंगी, निजामपूर छत्री आणि वाळण परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये लपून राहत असल्याचे समोर आले

Pune Crime: 2002 murderer, arrested in 2026; Murderer over tobacco dispute jailed after 24 years | Pune Crime : २००२ चा खुनी, २०२६ मध्ये अटक; तंबाखूच्या वादातून खून करणाऱ्याला २४ वर्षांनी बेड्या

Pune Crime : २००२ चा खुनी, २०२६ मध्ये अटक; तंबाखूच्या वादातून खून करणाऱ्याला २४ वर्षांनी बेड्या

पुणे : 'कानून के हात लंबे होते है' हा डायलॉग चित्रपटांमध्ये अनेकदा ऐकायला मिळतो. मात्र, पुण्यात घडलेल्या एका घटनेत हा डायलॉग अक्षरशः खरा ठरला आहे. तब्बल २४ वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक करत जुन्या गुन्ह्याचा शेवट केला आहे.

२००२ साली पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात बाबुराव रामभाऊ मरगळे यांचा निर्घृण खून झाला होता. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले होते. बाबुराव मरगळे यांनी गावातीलच हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार याच्याकडे तंबाखू मागितली होती. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात हिऱ्या उर्फ हिरामण याने काठीने मारहाण करत बाबुराव मरगळे यांचा खून केला.

या घटनेनंतर वेल्हा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला आणि तब्बल २४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत राहिला. या काळात त्याने आपली ओळख लपवून विविध ठिकाणी वास्तव्य केल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकातील सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांच्यावर हिऱ्या उर्फ हिरामण याला अटक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. आरोपी रायगड जिल्ह्यातील वारंगी, निजामपूर छत्री आणि वाळण परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये लपून राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

प्रदीप कुदळे आणि सोमेश राऊत यांनी लाकडाचे व्यापारी असल्याचे भासवून वेशांतर केले आणि त्या भागात जाऊन आरोपीशी संपर्क साधला. त्यांनी त्याचा विश्वास संपादन केला. मात्र, काही वेळाने आरोपीला संशय आला आणि तो डोंगरदऱ्यांत पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलीस पाटील आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली. २४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे, पोलीस हवालदार सोमेश राऊत आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ही धाडसी मोहीम यशस्वी केली.

Web Title : पुणे: 2002 के हत्या मामले का पर्दाफाश, 24 साल बाद आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे पुलिस ने 2002 के हत्या मामले में 24 साल बाद एक व्यक्ति को गिरफ्तार किया। आरोपी ने वेल्हा तालुका में तंबाकू विवाद में एक व्यक्ति की हत्या कर दी थी। वह वर्षों तक गिरफ्तारी से बचता रहा, रायगढ़ जिले की पहाड़ियों में छिपता रहा, फिर एक विशेष पुलिस टीम ने उसे पकड़ लिया।

Web Title : Pune: 2002 Murder Case Solved, Accused Arrested After 24 Years

Web Summary : Pune police arrested a man after 24 years for a 2002 murder. The accused killed a man over a tobacco dispute in Velha taluka. He evaded capture for years, hiding in the Raigad district hills before being apprehended by a special police team.