Pune Accident: भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईड घुसली; धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: May 15, 2025 20:40 IST2025-05-15T20:39:57+5:302025-05-15T20:40:47+5:30

पोर्शे कार अपघाताला वर्षपूर्ती होत असतानाच हा भयानक अपघात घडला असून वकिलाला यामध्ये जीव गमवावा लागला आहे

Pune Accident Speeding Fortuner car entered the wrong side Biker lawyer dies in collision | Pune Accident: भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईड घुसली; धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू

Pune Accident: भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईड घुसली; धडकेत दुचाकीस्वार वकिलाचा मृत्यू

पुणे: भरधाव पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत गेल्या वर्षी मे महिन्यात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेला वर्ष होत नाही तोच, भरधाव फॉर्च्युनर कारने राँग साईड येत दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वकीलाचा मृत्यू झाला. अनिकेत अरुण भालेराव (३५, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे काका शांताराम गोपाळ भालेराव (५२) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, दुचाकीला उडवल्यानंतर फॉर्च्युनर मधील चालक आणि एक युवती घटनास्थळावरून पसार झाले. 

हवेली पोलिसांनी याप्रकरणी फॉर्च्युनर (एमएच १४ ई ए ००५१) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी (दि. १४) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पानशेत ते पुणे रोडवर मनेरवाडी येथे तारांगण हॉटेलसमोर घडली. शांताराम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या अनिकेत भालेराव हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत होते. बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ते भाजीपाला आणण्यासाठी खानापूर येथे गेले होते. साडेचारच्या सुमारास अनिकेत पानशेत ते पुणे रोडवरील तारांगण हॉटेलसमोरून जात असताना, समोरून भरधाव राँग साईडने आलेल्या फॉर्च्युनरने त्यांना समोरून जोराची धडक दिली. यात अनिकेत गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांच्या गुडघ्याला तसेच डाव्या हाताला मार लागला होता. सुरूवातीला त्यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी अनिकेत यांना मयत घोषित केले.

चालक दारू पिलेला असल्याची शक्यता..

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी आणि अनिकेत यांच्या नातेवाईकांनी बोलताना फॉर्च्युनर कारचा चालक राज चोरघे नामक व्यक्ती असल्याची माहिती दिली. अपघातावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे देखील नातेवाईकांनी सांगितले. अपघातावेळी फॉर्च्युनर कारमध्ये एक युवती देखील होती अशी माहिती त्यांनी दिली. अपघातानंतर कारचालक संबंधित युवतीला घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. तो देखील एका खासगी रुग्णालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. त्यानंतर सध्या कारचालक एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

१९ मे २०२४ रोजी पोर्शे अपघात..

गेल्यावर्षी १९ मे रोजी येरवड्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कार चालक अल्पवयीनाबरोबर कारमध्ये त्याचे दोन मित्र होते. अगरवालचा मुलगा, त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी मद्यप्राशन केले होते. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आजही कौतुक होत आहे. घटनेनंतर आज वर्षभरानंतरही या प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आई व्यतिरिक्त अन्य आरोपी जेलमध्ये आहेत. या फॉर्च्युनर अपघात प्रकरणात देखील ग्रामीण पोलिसांनी अशीच भूमिका घ्यावी अशी मागणी अनिकेत यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

आरोपीला डिस्चार्ज मिळताच अटक करणार..

आम्ही घटनेची माहिती समजताच, लगेचच घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहे. फॉर्च्युनर कारमधील चालकावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्यपान केल्याचा संशय असल्याने आम्ही त्याचे ब्लड सँम्पल देखील घेतले आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान, डॉक्टरांनी कार चालकाला डिस्चार्ज केल्यानंतर आम्ही लगेचच त्याला अटक करणार आहोत. - सचिन वांगडे, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

Web Title: Pune Accident Speeding Fortuner car entered the wrong side Biker lawyer dies in collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.