देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:06 IST2025-07-04T20:05:48+5:302025-07-04T20:06:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आरोग्यावरील बजेट तीनपट करून चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत

Prime Minister Modi took the country's health budget from Rs 37,000 crore to Rs 1 lakh crore - Amit Shah | देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह

देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे. देशाचे आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटी रुपये होते. हे बजेट आता १ लाख ३६ हजार कोटींपर्यंत नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. आरोग्यावरील बजेट तीनपट करून चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

पुना लाइफस्पेस इंटरनॅशनलचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पुना हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे विश्वस्त देविचंद के. जैन, राजकुमार चोरडिया, पुरुषोत्तम लोहिया आदी उपस्थित होते.

पुना लाइफस्पेस इंटरनॅशनलचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय १४ एकर क्षेत्रावर उभारले जाणार आहे. त्यासाठी ९०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हे रुग्णालय पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यासाठी सेवेचे माध्यम बनेल, असे सांगून अमित शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे. अस्वच्छतेमुळे ७० टक्के आजार होत आहेत. त्यामुळे स्वच्छतेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. देशात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. देशभरात शौचालय उभारण्यासाठी अनुदान देण्याचे काम केले आहे. योगामुळे शरीर, मन, आत्मा चांगले राहते. फिट इंडिया हा उपक्रम राबविला आहे. देशातील ८० कोटी गरीब रुग्णांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार केले जाणार आहेत. एमबीबीएसच्या ५१ हजार जागा होत्या. आता दुप्पट होऊन १ लाख १८ हजार झाल्या आहेत. कोरोनावरील लस तयार करण्यामध्ये आपल्या देशाचा समावेश आहे. भारताने ८७ देशांना कोरोनाची लस दिली, असेही शाह म्हणाले. राजकुमार चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले.

बाळासाहेब देवरस रुग्णालयाची केली पाहणी

कोंढवा बुद्रूक येथील खडी मशीन चौकातील बाळासाहेब देवरस रुग्णालयाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाहणी केली. या रुग्णालयाच्या पहिल्या टप्पातील ३०० बेडचे रुग्णालय २०२६च्या एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. या रुग्णालयाच्या सर्व माहिती अमित शाह यांनी घेतली.

Web Title: Prime Minister Modi took the country's health budget from Rs 37,000 crore to Rs 1 lakh crore - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.