फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:21 IST2025-12-01T06:19:31+5:302025-12-01T06:21:48+5:30
वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच ॲप काम करेल अन्यथा ॲप तात्काळ बंद होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे.

फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत व्हॉट्सॲप्स, सिग्नल, टेलिग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या ॲप-आधारित कम्युनिकेशन ॲप्सना 'सिम लिंक' करणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच ॲप काम करेल अन्यथा ॲप तात्काळ बंद होईल. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे. दूरसंचार विभागाने अधिसूचना जारी करत ॲप-बेस्ड ॲप्सना निर्देश दिले आहेत.
नवीन नियम काय आहेत?
फोनमध्ये तेच सिम नसले तर ॲप बंद: व्हॉट्सॲप, सिग्नल, टेलिग्राम, शेअरचॅट, जिओचॅट, स्नॅपचॅट यांसारख्या ॲप्सना सतत तपासावे लागेल की नोंदणीकृत नंबरचे सिम फोनमध्ये आहे का. सिम नसल्यास ॲप बंद करणे बंधनकारक.
वेब आवृत्त्यांसाठी कडक नियम
व्हॉट्सॲप वेब, टेलिग्राम वेब यांसारख्या वेब सेवांना प्रत्येक ६ तासांनी स्वयंचलित लॉगआऊट करावे लागेल. यामुळे वापरकर्त्यांना पुन्हा-पुन्हा स्वतःची ओळख पडताळावी लागणार आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी हे आवश्यक आहे.
का आणले 'सिम लिंक'चे नियम ?
परदेशातून येणाऱ्या सायबर फसवणूक कॉल/मेसेंजबद्दल वाढता धोका
ॲप्सचा वापर करून ओटीपी, ओळख आणि नंबर लपवणे शक्य
टेलिकॉम आयडेंटिफायरचा गैरवापर
वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी सिस्टीम मजबूत करणे
नियम न पाळल्यास कडक कारवाई
नवीन निर्देशांचे पालन न केल्यास ॲप-बेस्ड सेवांवर दूरसंचार अधिनियम २०२३, टेलिकॉम सायबर सिक्युरिटी नियम, तसेच इतर कायद्यांनुसार कारवाई होणार आहे.
सरकारने काय म्हटले?
फोनमध्ये सिम नसतानाही चालणाऱ्या ॲप्सचा वापर देशाबाहेरून होत असलेल्या सायबर फसवणुकीत वाढ आहे. टेलिकॉम सायबर सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रमुख ॲप कंपन्यांसोबत चर्चा सुरू होत पण, सायबर धोका गंभीर असल्याने औपचारिक आदेश देणे आवश्यक झाले आहे.
कशामुळे कारवाई? : अनेक ॲप्स
सिम कार्ड डिव्हाइसमध्ये नसतानाही सेवा देत आहेत. या फीचरचा विदेशातृ होणाऱ्या सायबर फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता.