"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By सुदाम देशमुख | Updated: April 18, 2026 09:57 IST2026-04-18T09:52:04+5:302026-04-18T09:57:30+5:30

संगमनेरच्या वडगावपान येथील भोंदू गडगे बाबाला पोलिसांनी केली अटक

Self Styled Godman Gadge Baba Arrested in Sangamner Wadgaon Pan for Defrauding People | "मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

संगमनेर : कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवीशक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो. घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो. असे सांगून लोकांकडून रुपये उकळणाऱ्या भोंदू गडगे बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. गडगे विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर संबंधितांनी सोशल मीडियात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ शेअर केला होता. 

भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे,  डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगावपान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधूकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याला वडगाव पान येथून ताब्यात घेत अटक केली.
 
 संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे बाबाच्या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तेथील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, संगमनेर उपविभागीय अधिकारी तसेच संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम ३सह ड्रग्स ॲण्ड मॅजिक रेमिडिज ॲक्ट १६५४ चे कलम ७ मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टचे कलम ३३.३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे करीत आहेत.

Web Title: Self Styled Godman Gadge Baba Arrested in Sangamner Wadgaon Pan for Defrauding People