आवक वाढल्याने लसूण, शेवगा, गाजराचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:11 IST2021-03-08T04:11:15+5:302021-03-08T04:11:15+5:30

पुणे : मार्केट यार्डात बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढल्यामुळे लसूण, शेवगा आणि गाजराच्या दरात घट झाली. तर ...

Prices of garlic, sugarcane and carrots declined due to higher inflows | आवक वाढल्याने लसूण, शेवगा, गाजराचे दर उतरले

आवक वाढल्याने लसूण, शेवगा, गाजराचे दर उतरले

पुणे : मार्केट यार्डात बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढल्यामुळे लसूण, शेवगा आणि गाजराच्या दरात घट झाली. तर वाढत्या उन्हामुळे काकडीची मागणी वाढल्याने काकडीसह मटारच्या दरात चांगली वाढ झाली. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. ७) रोजी १०० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून ७ टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक गुजरात आणि आंध्र प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि पंजाबमधून मटार ६ ते ७ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातधून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक इतकी आवक झाली.

याशिवाय स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १५०० ते १६०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, प्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ४ ते ५ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, गावरान कैरी २ टेम्पो, लाल कांदा १०० ट्रक, पांढरा कांदा ४ ते ५ ट्रक इतकी आवक झाली.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा १०-२३ २५-४०

बटाटा ०८-१३ १५-३०

टोमॅटो ०६-१० १५-२५

भेंडी २५-३० ३०-४०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार ३५-४० ४०-५०

गाजर १०-१४ १५-२०

--

शेपू, चाकवत, चुका आणि पालकचे दर पडले

मार्केट यार्डात रविवारी शेपू, चाकवत, चुका आणि पालकच्या दरात घट झाली असून, मेथी, करडई आणि राजगिऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. तर कोथिंबीर, कांदापात, पुदीना, अंबाडी, मुळे, चवळई आणि हरभऱ्याच्या गड्डीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

राजगिऱ्याच्या दरात तीन रुपयांनी वाढ

रविवारी मार्केट यार्डात कोथिंबीरीच्या दीड लाख जुड्यांची, मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली. शेपू, चाकवत आणि पालकच्या भावात घाऊक बाजारात प्रत्येकी दोन रुपयांची तर चुक्याच्या दरात एक रुपयांची गड्डीमागे घसरण झाली आहे. तर मेथी आाणि करडईच्या दरात जुडीमागे एक रुपयांची तर राजगिऱ्याच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली.

Web Title: Prices of garlic, sugarcane and carrots declined due to higher inflows