आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी; ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:13 IST2025-01-13T18:13:22+5:302025-01-13T18:13:30+5:30
ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेत त्याचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ५ लाख ३५ हजार २०० रुपये काढून घेतले

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी; ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
पुणे : आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३५ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका बँक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार कोथरूडमधील गुरूराज हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत. डिसेंबर महिन्यात चाेरट्याने या ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने आर्मी ऑफिसर असून, कोथरूड भागात सदनिका भाडेतत्त्वावर घ्यायची आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना डिपॉझिटसाठी लागणारी रक्कम पाठवतो, असे सांगितले. ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याचा गैरवापर करून चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून ५ लाख ३५ हजार २०० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने पुढील तपास करत आहेत.