पोलिस शिपायासह निवृत्त पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:40 IST2025-10-14T17:39:39+5:302025-10-14T17:40:08+5:30
- वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

पोलिस शिपायासह निवृत्त पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
पुणे : वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारणारा कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात पोलिस शिपायासह त्याला मदत करणाऱ्या एका निवृत्त पोलिस उप निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ बापू महारनवर (३४ वर्षे, रा. शेवाळवाडी ता. हवेली) असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे तर युवराज कृष्णा फरांदे (५९ वर्षे, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) असे महारनवर याला मदत करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका भाडेकरूसह त्याच्या घर मालकावर वीजचोरीचा गुन्हा दाखल आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्याला अटक न करण्यासाठी महारनवर याने ५ हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर घर मालकाने महारनवर याला ५ हजार रुपये दिले. या लाचेची चर्चा झाल्यानंतर महारनवर याने भाडेकरूकडे ५ हजारांची मागणी केली व ती रक्कम घर मालकाला देण्यास सांगितले. तसेच सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक फरांदे याने त्यांना फोनवर लाच देण्याची मागणी करत महारनवर याला मदत केली.
याबाबत भाडेकरूने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर महारनवर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सोमवारी कोंढवा पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा लावला होता. ठरल्यानंतर तक्रारदार व त्याचा घरमालक पोलिस स्टेशनसमोर गेले. त्यावेळी तेथे पोलिस शिपाई महारनवर हाही उपस्थित होता. तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना चपतच्या पथकाने महारनवरला रंगेहाथ पकडले. तसेच महारनवर व फरांदे या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उप आयुक्त, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली
पोलिस स्टेशनमध्ये किंवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध प्रकार व घडना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस आयुक्तांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात लाच स्वीकारण्याची घटना घडली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सोमवारी रात्री पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची यंत्रण कक्षात बदली केली.