‘पीएमपी’च्या अपघाताला ब्रेक लागेना; चालकांकडून नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केल्याने जातोय निष्पापांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:34 IST2025-11-24T16:33:21+5:302025-11-24T16:34:44+5:30
गर्दीच्या वेळी सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने बस चालविणे, बस चालवताना मोबाइलवर बोलणे यांसारख्या गोष्टी पीएमपी चालकांकडून सर्रास केले जाते

‘पीएमपी’च्या अपघाताला ब्रेक लागेना; चालकांकडून नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केल्याने जातोय निष्पापांचा बळी
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसचे (पीएमपी) अपघात कमी होण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, काही बेजबाबदार चालकांमुळे पीएमपीच्या अपघातात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड वर्षात पीएमपीचे ७५ अपघात झाले असून, यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ९९ नागरिक अपघातग्रस्त झाले आहेत. यामध्ये मालकी बसपेक्षा खासगी बसचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून दैनंदिन १० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २०१९ बस असून, यातील १ हजार ७०० बस विविध मार्गांवर धावतात. यातील बऱ्याच बस बाहेरील मार्गावर धावतात. त्यातील बहुतांश बसचे किरकोळ व बऱ्याच वेळा मोठे अपघात हाेतात. पीएमपी बसचे अपघात कमी व्हावे, यासाठी स्पीड लाॅक बसविण्यात आले आहे. त्याचा परिणाम स्वमालकीच्या चालकांवर झाला आहे. परंतु भाडेतत्त्वावरील चालकांना काही फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मृत्यूचा बळी पडावा लागत आहे. शिवाय अनेक वेळा बसचालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्याचा परिणामदेखील अपघातातमध्ये होतो. यामध्ये किरकोळ, गंभीर अपघातांचे प्रमाणदेखील वाढत आहे. गेल्या दीड वर्षात एकूण गंभीर ७५ अपघात झाले असून, त्यात ४४ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये स्वमालकीच्या चालकांपेक्षा भाडेतत्त्वावरील बसचालकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भाडेतत्त्ववरील चालकांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. पीएमपी प्रशासनाकडून वेळोवेळी चालकांना सीआयआरटी येथे प्रशिक्षण देण्यात येते. परंतु, वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्यांना अपघातात मृत्युमुखी पडावे लागत आहे.
वाहतूक नियमाकडे होते दुर्लक्ष
गर्दीच्या वेळी सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने बस चालविणे, बस चालवताना मोबाइलवर बोलणे यांसारख्या गोष्टी पीएमपी चालकांकडून सर्रास केले जाते. परंतु, याकडे वाहतूक पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होते. मात्र, सर्वसामान्य वाहनचालक गाडी चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास त्याच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येते. अशा वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात होत आहेत. यामुळे जबाबदार चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
खासगी बसचालक सुसाट
पीएमपीकडून गेल्या जानेवारी महिन्यात वाहतूक प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे स्वमालकी चालकांच्या अपघाताचे प्रमाणे कमी आहे. परंतु भाडेतत्त्वारील बसच्या अपघातात वाढ होत आहे. गेल्या सात महिन्यांत स्वमालकी बसचे ५ अपघात झाले असून, एक जणांचा मृत्यू झाला आहे. तर भाडेतत्वावरील १७ अपघात झाले असून, यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसचालक वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
अपघाताची आकडेवारी : (जानेवारी ते ऑक्टोबर २०२५)
(मालकी बस/भाडेतत्त्वावरील)
एकूण अपघात - २२
मृत्यू -- १५
अपघातग्रस्त व्यक्ती -२७
अपघाताची आकडेवारी : (एप्रिल २४ ते मार्च २०२५)
(मालकी बस/भाडेतत्त्वावरील)
एकूण अपघात - ५३
मृत्यू -- २९
अपघातग्रस्त व्यक्ती -७२