पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:26 IST2025-12-30T12:24:54+5:302025-12-30T12:26:49+5:30
आळेफाटाच्या दिशेने शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप गाडी व कल्याणच्या दिशेने येणारा दूध टँकर यांची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेल जवळ समोरासमोर धडक झाली

पिकअप - दूध टँकरची भीषण धडक; २ महिला शेतमजुरांचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी, नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील घटना
ओतूर: नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे मंगळवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी पिकअप व दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील दोन महिला शेतमजूर ठार झाल्या असून अंदाजे ३५ ते ३८ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अधिक माहिती अशी की, आळेफाटाच्या दिशेने शेतमजूर घेऊन जाणारी पिकअप गाडी व कल्याणच्या दिशेने येणारा दूध टँकर यांची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेल जवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत पिकअपचा चालक व त्यातील शेतमजूर मोठ्या प्रमाणात जखमी झाले. दूध टँकर चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर काही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात तसेच मंचर येथील आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
या अपघातात पिकअपमधील वंदना गणेश हिल्लम (वय २०) रा. खुट्टल ता. मुरबाड जि. ठाणे व मंदा शिवराम हिल्लम (वय ३५), रा. तळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे यांचा मृत्यू झाला तर ओतूर, बगाडवाडी,अकोले, पाचघर, निमगिरी, लहाळी, टोकवडा, फोफसंडी, मांडवे, बल्लाळवाडी येथील एकूण २६ महिला पुरुषांनी प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार केले अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. श्रीहरी सारोकते, प्रशांत गोरे यांनी दिली. अपघातानंतर काही काळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करीत आहेत.