विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:32 IST2026-01-01T14:31:28+5:302026-01-01T14:32:18+5:30
आळंदी - मरकळ मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली आणि हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकूण २८ जण जखमी झाले आहेत

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात; २८ जण जखमी, आळंदी - मरकळ मार्गावरील घटना
आळंदी : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कुरुळीहून निघालेल्या पिकअप गाडीला आळंदी - मरकळ मार्गावर भीषण अपघात झाला. मरकळ गावच्या हद्दीत रविन केबल कंपनीसमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या दुर्घटनेत एकूण २८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास कुरुळी, सोनवणे वस्ती (ता. खेड) येथील भाविक पिकअप गाडीने (एमएच १४ एलबी ३०९७) आळंदी - मरकळमार्गे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमाला जात होते. मरकळ हद्दीत आल्यानंतर अचानक गाडीला झोला बसला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे पिकअप गाडी रस्त्यावरच पलटी झाली.
दरम्यान अपघात होताच परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. पिकअपमध्ये मोठ्या संख्येने लोक असल्याने जखमींचा आकडा २८ वर पोहोचला आहे. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. आळंदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून आळंदी ग्रामीण रुग्णालय, के. के. हॉस्पिटल व वायसीएम रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. आळंदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, ओव्हरलोडिंग किंवा तांत्रिक बिघाड या पैलूंचा विचार केला जात आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.