आई-वडिल घरात घेत नाहीत; राग अनावर झाला, पठ्ठ्याने कोयत्याने ३ दुचाकीच फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:17 IST2025-11-20T16:17:03+5:302025-11-20T16:17:32+5:30
मुलगा २० वर्षांचा असून काही कामधंदे करत नसल्याने त्याला आई वडील घरात घेत नव्हते

आई-वडिल घरात घेत नाहीत; राग अनावर झाला, पठ्ठ्याने कोयत्याने ३ दुचाकीच फोडल्या
धनकवडी : आई-वडिल घरात घेत नाहीत, या रागातून एका तरुणाने घरातील कोयत्याने रस्त्यावरील दुचाकी फोडल्या. घटनास्थळी असलेल्या बीट मार्शनले तात्काळ पाठलाग करुन तरुणाला पकडले. याप्रकरणी मार्शलने दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश पवार ( २०, रा. आंबेगाव पठार) असे आरोपीचे नाव आहे.
यश पवार सध्या काहीही काम धंदे करत नाही. त्याचे वडिल मजुरी काम तर आई घरकाम करते. पालकांनी त्याची अनेकदा समजूत घातली तरी तो ऐकण्याच्या मानसिकतेत नसायचा. यामुळे त्याला आई- वडिल घरात घेत नव्हते. बुधवारी रात्री ही याच कारणावरुन भांडणे झाल्याने त्याने घरातील कोयता घेऊन घरासमोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींवर मारला. यामध्ये दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. दरम्यान गस्तीवर असलेल्या बीट मार्शलला ही खबर मिळताच, त्याने पळत जाऊन यशला पकडला. नागरिकांच्या वतीने कोणीच तक्रार देण्यास पुढे न आल्याने बीट मार्शलने तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शना खाली केला जात आहे.