विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:36 IST2025-05-09T11:35:51+5:302025-05-09T11:36:34+5:30
नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही, परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी

विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन
पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला परिवहन विभागाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले
यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. ८) सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस असोसिएशन व पालक संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्यासह असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले, स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये. नियमांचे पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे. स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही; पण नियमही शिथिल होणार नाहीत. स्कूल बस वाहतूक क्षेत्राशी आपण अनेक वर्षे जोडलेलो आहे, त्यामुळे या क्षेत्रातील अडचणी ज्ञात आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही. परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.
अनधिकृत स्कूल बसवर कारवाई
राज्यात ५० ते ६० हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या अनेक तक्रारी स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. पुढील ३ महिन्यांमध्ये या अनधिकृत स्कूल बस चालक-मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.