कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही; ॲक्शनला रिएक्शन मिळणारच, अमित ठाकरेंचा एबीव्हीपीला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:24 IST2025-10-14T13:22:58+5:302025-10-14T13:24:04+5:30
सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं निघाली तर एबीव्हीपीचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील

कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही; ॲक्शनला रिएक्शन मिळणारच, अमित ठाकरेंचा एबीव्हीपीला इशारा
पुणे : वाडिया महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनाच्या ठिकाणीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पोस्टर लावण्यात आल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी (दि. १३) वाद निर्माण झाला. याबाबत मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. या प्रकाराबाबत पुणे पोलिस आयुक्तांसमोर बाजू मांडण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे मंगळवारी पुण्यात आले होते. यावेळी आयुक्तांशी भेट झाल्यावर माध्यमांशी संवाद साधला.
अमित ठाकरे म्हणाले, काल जो राडा झाला. त्यानंतर मी आज आयुक्तांना भेटायला आलो होतो. हे दुसऱ्यांदा झाल आहे. ते जरी सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी काही फरक पडणार नाही. मी माझ्या मुलांसोबत आहे. तुम्ही बोट घातलं तर आम्ही हात घालणार ॲक्शनला रिएक्शन मिळणारच असा इशारा अमित ठाकरेंनी एबीव्हीपीला दिला आहे.
कायदा सुव्यवस्था मला बिघडवायची नाही. एवढेच मी सांगतोय की, कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचा अस्तित्व निर्माण करा. काल एका ऑफिसला टाळे ठोकले आहे. जे पोस्टर लावलेला आहे. त्यावर मी आयुक्तांशी बोललो आहे. सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं निघाली तर त्यांचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील. यापुढे जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट लिहिल तर चालेल का? ती मुले कोण आहेत ते बघू या पुढे आमची अशीच रिएक्शन मिळणार आहे. आमच्यावर ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केला आहे. छोटा गुन्हा आहे. गुन्हे अंगावर घ्यायची आम्हाला सवय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुण्याची परिस्थिती भीषण
पुण्याची भीषण परिस्थिती झाली आहे. ड्रग्स, महिलांवर अत्याचार, लहान मुलांना दारू मिळणे या गंभीर गोष्टी आहेत. पोर्शे अपघातात दोन मुलांना उडवलं काय झाले पुढे त्याचे? पुण्याच्या भीषण परिस्थितीवर आता फक्त पोलीस आयुक्त काम करू शकतात हे आज मी सांगून आलेलो आहे. अठरा वर्षाखालील मुलांना ड्रग्स दारू देत असाल हे भीषण आहे. याची आम्ही लिस्ट तयार करणार आहे.