निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:23 IST2025-10-18T18:22:43+5:302025-10-18T18:23:42+5:30
कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरोधात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत

निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे: कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, तसेच वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेला धमकावून निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि साथीदारांनी ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घायवळसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका शाळेतील क्रीडा शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या निलेश घायवळविरोधात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत एका खासगी कंपनीतील संचालक महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बापू कदम, निलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी भागीदारीत एक कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या कंपनीचे कार्यालय प्रभात रस्ता परिसरात आहे. या कंपनीकडून कर्वेनगर, शिवणे भागातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ, तसेच वाहतूक सुविधा पुरवली जाते. शाळांना नियमित भेट देण्यात येत असल्याने महिलेची शाळेतील कर्मचाऱ्यांशी ओळख झाली होती. कर्वेनगर भागातील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारा आरोपी बापू कदम याच्याशी महिलेची ओळख झाली होती. २०२४ मध्ये कदमने महिलेची भेट घेतली. ‘माझी कोथरूड भागात डेअरी आहे. शाळेतील उपाहारगृहात दूध आणि पनीर पुरवठा करण्याचे काम मला द्या. माझ्याकडून पनीर, दूध खरेदी करा’, असे त्याने सांगितले. दरम्यान, कदम याचा गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची माहिती महिलेला मिळाली होती. त्यानंतर कदमच्या खात्यात महिलेने २२ लाख २ हजार रुपये वेळोवेळी पाठवले. मात्र, त्याने पनीर, दूध पुरवठा केला नाही. महिलेने बाहेरून पनीर, दूध खरेदी करून शाळेतील उपाहारगृहाला पुरवले.
पैसे घेऊनही माल न पुरवल्याने महिलेने त्याच्याकडे विचारणा केली. जानेवारी २०२५ मध्ये महिलेने कदमची भेट घेतली तेव्हा, ‘‘मी निलेश घायवळ टोळीसाठी काम करत असून, घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे. शाळेतील उपाहारगृहासाठी आमच्याकडून दूध, पनीर खरेदी करावे लागेल. अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडू,’’ अशी धमकी कदमने महिलेला दिली. त्यानंतर महिला कारने शाळेच्या परिसरातून निघाली होती. त्यावेळी कदमने कार अडवली. त्यावेळी दुसऱ्या कारमधून निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन आणि साथीदार उतरले. घायवळचा भाऊ सचिन याने धमकावले. ‘‘तुम्हाला जिवंत राहायचे नाही का?’’ अशी धमकी देऊन लवकर खात्यात पैसे जमा करा, असे सांगितले. त्यानंतर महिलेने घाबरून पुन्हा २२ लाख रुपये बँक खात्यात जमा केले. व्यवसाय बंद होऊ नये म्हणून मी आरोपींना पैसे दिले. याबाबत महिलेने कंपनीतील भागीदारांशी चर्चा केली. चौकशीत कदम याची कोथरूडमध्ये डेअरी नसल्याची माहिती समजली. त्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.