Pune Crime: घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:27 IST2026-01-13T12:27:35+5:302026-01-13T12:27:50+5:30
नायजेरियन महिलेच्या घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र आले असताना प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद निर्माण झाला

Pune Crime: घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना
पुणे: प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून एका नायजेरियन नागरिकावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येमेका क्रिस्टीएन (४०, रा. फुरसुंगी, मूळ रा. नायजेरिया) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नायेमेका मदुबची ओनिओ आणि किन्सली ओबा (दोघेही रा. लिमरास हाईट सोसायटी, पद्मावतीनगर, पिसोळी, मूळ- नायजेरिया) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. इतरांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १२) पिसोळी येथील लिमरास हाइट सोसायटीमधील एका घरात ही घटना घडली. एनकेनिया पेंट्रिशिया मबिगा या नायजेरियन महिलेच्या घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक येमेका क्रिस्टीएन, किन्सली, ओबी, ओजे ओजगवा व नायेमेका मादूबुची ओनिया हे एकत्र आले होते. यावेळी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून येमेका क्रिस्टीएन व इतरांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये किन्सली, ओबी, नायेमेका मादूबुची ओनिया व ओजे ओजगवा यांनी संगनमत करून येमेका क्रिस्टीएन याच्या डोक्यावर, हातावर व पायांवर मारहाण करून गंभीर जखमी केले.
जखमी येमेका क्रिस्टीएन याला त्याचा मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह (३९, व्हाईस प्रेसिडेंट, नायजेरियन स्टुडंट्स युनियन इन पुणे, रा. उंड्री) याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी नायेमेका मादूबुची ओनिया व ओबी यांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.