नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:57 IST2025-11-15T10:56:05+5:302025-11-15T10:57:45+5:30
प्रशासनाने ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडून या ‘खून’ ठरलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल
धायरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या नऱ्हे गावानजीक आणि विशेषतः नवले पूल परिसरात रोज लहान-मोठे अपघात घडत असल्याने हा भाग आता ‘मौत का कुंआ’ बनला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि ठोस उपाययोजनांच्या अभावामुळे या अपघातांची मालिका सुरूच असून, स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. हा अपघात नसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेला ‘खून’ असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महामार्गावर अपघात घडला की, ‘वाहनचालकाची चूक’, ‘ब्रेक फेल’ किंवा ‘नियंत्रण सुटणे’ अशी कारणे दिली जातात. मात्र, या अपघातांचे प्रमुख कारण परिसराची रचना आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हेच आहे. महामार्गाला असलेला तीव्र उतार हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अवजड वाहनांना अचानक ब्रेक लावून नियंत्रित करणे अशक्य होते. काही ठिकाणी सेवा रस्ते नसल्याने स्थानिक वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे भाग पडते, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. वडगाव बुद्रूक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. वारंवार अपघात होऊनही प्रशासन केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर वेळ मारून नेत आहे आणि ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. स्थानिक नागरिक संतप्त होऊन प्रशासनाला सवाल करीत आहेत, इथे सर्वसामान्य माणसाच्या जिवाची काही किंमत नाही का? अजून किती निष्पाप लोकांचे जीव घेणार आहात? मरण एवढे स्वस्त झाले आहे का? प्रशासनाने ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडून या ‘खून’ ठरलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
उपाययोजना..
उताराची तीव्रता कमी करा : राष्ट्रीय महामार्गावरील उताराची तीव्रता कमी करणे, हा अपघातांवरचा एकमेव आणि ठोस पर्याय आहे.
रिंग रोडची निर्मिती : लवकरात-लवकर बाह्यवळण तयार करून अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवावी.
सेवा रस्ते पूर्ण करा : नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान अर्धवट स्थितीत असणारे सेवा रस्ते त्वरित पूर्ण करावेत. तसेच वारजे पूल ते वडगाव पुलादरम्यानही सेवा रस्ता करणे आवश्यक आहे.
स्थानिक वाहतूक व्यवस्थापन : सर्व स्थानिक वाहतूक सेवा रस्त्यांवरूनच होईल यासाठी योग्य उपाययोजना करावी.
गडकरींचे आश्वासन हवेत विरले; ५ वर्षांनंतरही प्रश्न जैसे थे
या महामार्गावरील कात्रज-देहू रोड बाह्यवळण मार्गाचा रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील सहा महिन्यांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता ५ वर्षे उलटून गेली तरीही यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याचे चित्र आहे.
एलिव्हेटेड पूल अद्याप कागदावरच...
नवले पूल परिसरात वारंवार होणारे अपघात आणि सततची वाहतूककोंडी लक्षात घेऊन, स्वामीनारायण पूल ते वारजे यादरम्यान थेट एलिव्हेटेड पूल बांधण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. यासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची मागणीही करण्यात आली होती. मात्र, दुर्दैवाने अद्याप या पुलाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. हा महत्त्वपूर्ण एलिव्हेटेड पूल प्रत्यक्षात कधी उतरणार की केवळ कागदावरच राहणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.