नसरापूर अत्याचार प्रकरण: आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:01 IST2026-05-17T10:59:56+5:302026-05-17T11:01:49+5:30
- दोषारोपपत्रात आरोपीची संपूर्ण माहिती, त्याची गुन्ह्यातील भूमिका आणि घटनाक्रमाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरण: आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र शनिवारी दाखल करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याने तपासाची गती आणि कार्यपद्धती विशेष ठरली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पुढील आठवड्यात या प्रकरणाची ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती दिली.
दोषारोपपत्रात आरोपीची संपूर्ण माहिती, त्याची गुन्ह्यातील भूमिका आणि घटनाक्रमाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पीडित बालिकेचे वय सिद्ध करणारे अधिकृत पुरावे दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचार व खुनासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचे पुरावे म्हणून जोडले आहेत. आरोपीविरुद्ध तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला असून तपास अधिक भक्कम करण्यात आला आहे.
घटनास्थळ पंचनामा, जप्त केलेले पुरावे आणि फॉरेन्सिक तपास अहवालांचाही दोषारोपपत्रात समावेश आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलिस व सरकारी पक्षाने जलदगतीने तपास पूर्ण केला.
नसरापूर गावात सुट्टीसाठी आजोळी आलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचे ६५ वर्षीय व्यक्तीने अपहरण करून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भीमाजी कांबळे (वय ६५) या संशयित आरोपीला अटक केली. यात आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या. श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले जाईल आणि नराधमाला कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या १४ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले.