वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:34 IST2025-11-15T10:33:40+5:302025-11-15T10:34:36+5:30
स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस त्याचदिवशी होता, केक आणि पावभाजीची तयारी करा आम्ही १० मिनिटात पोहचतो आहोत, असा शेवटचा फोन त्यांनी कुटुंबियांना केला होता

वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला
धायरी: सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द परिसराला गुरुवारी एका भीषण अपघाताच्या बातमीने शोकसागरात ढकलले. मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघातात नवलकर कुटुंबासह आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. नियतीचा क्रूर खेळ असा की, कुटुंबातील स्वाती संतोष नवलकर (३७) ज्या नवसपूर्तीसाठी देवाच्या चरणी गेल्या होत्या, तो नवसाचा शेवटचा गुरुवारच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा गुरुवार ठरला.
स्वाती नवलकर या आपल्या लहान मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य आणि आजारी असलेल्या वडिल दत्तात्रय दाभाडे यांना आराम मिळावा या हेतूने नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या. वडिलांना दीर्घ आजारातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी पाच गुरुवारांचा नवस केला होता. नवस पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या नवलकर कुटुंबावर घरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर, नवले पुलाजवळ काळाने घाला घातला.
भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने त्यांच्या कारला इतकी भीषण धडक दिली की, कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये स्वाती नवलकर यांच्यासह त्यांच्या आई शांता दाभाडे (५४), वडील दत्तात्रय दाभाडे (५८), कारचालक धनंजय कोळी (३०) यांचा समावेश आहे. तसेच कारचा चालक व लहान मुलीचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
"मला काही नाही पाहिजे, मला माझी आई पाहिजे!"
अपघातानंतरचा सर्वात हृदयद्रावक क्षण म्हणजे, स्वाती नवलकर यांच्यासोबत असलेली त्यांच्या मैत्रिणीची मुलगी मोक्षिता रेड्डी (३) हिचा देखील मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या कारमधून मृत्यूदेह बाहेर काढताना स्वाती यांनी त्या लहान मुलीला कवेत घेतले होते. अपघाताची बातमी समजताच स्वाती यांच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला आपल्या आईचे छत्र हरपल्याचे कळले, तेव्हा तिचा "मला काही नाही पाहिजे, मला माझी आई पाहिजे!" हा आर्त टाहो परिसर हेलावून टाकणारा होता. ही वेदना ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
आनंदाचा दिवस बदलला शोकात...
या दुर्दैवी घटनेला आणखी वेदना देणारा तपशील म्हणजे कारचालक धनंजय कोळी यांना नुकतेच बाळ झाले होते. कुटुंबाला घरी सोडल्यानंतर ते आपल्या पत्नी-बाळाकडे जाणार होते, पण एका क्षणात त्यांच्या कुटुंबाचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले.
शिवाय, स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस त्याचदिवशी होता. केक आणि पावभाजीची तयारी करा आम्ही दहा मिनिटात पोहचतो आहोत, असा शेवटचा फोन स्वाती यांनी कुटुंबियांना केला होता. मात्र आनंदाचा दिवस एका भीषण शोकात बदलल्याने नवलकर कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे. स्वाती यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि अजून लग्न न झालेली बहीण असा परिवार मागे राहिला आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या या कुटुंबाला या दुःखातून सावरणे कठीण असून, संपूर्ण वडगाव खुर्द परिसर हळहळ व्यक्त करत आहे.