पुणे : पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्त्यासोबत राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधीचे केवळ सहा हप्ते देण्यात आले, तर पीएम किसानच्या २० व्या हप्त्यासोबत मिळणारा नमो शेतकरीचा सातवा हप्ता एक महिना उशिरा आणि २१ व्या हप्त्यासोबतचा आठवा हप्ता तब्बल चार महिने उशिराने अर्थात बुधवारी (दि. २५) वितरित झाला आहे. विशेष म्हणजे, पीएम किसानचा २२ वा हप्ता १३ मार्चला वितरित झाला असला तरी नमो शेतकरीचा नववा हप्ता केव्हा मिळेल?, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. या आठव्या हप्त्यासाठी राज्यातील ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यात सर्वाधिक ५ लाख ४० हजार ६८९ शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून मिळणाऱ्या सहा हजार रुपयांच्या मानधनासोबत राज्य सरकारही तितकेच अर्थात ६ हजार रुपयांचे मानधन शेतकऱ्यांना देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार सुरुवातीचे सहा हप्ते एकत्रित देण्यात आले. मात्र, सातव्या हप्त्यापासून राज्य सरकारच्या या योजनेला निधीअभावी घरघर लागण्यास सुरुवात झाली. पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ऑगस्टमध्ये देण्यात आला. मात्र, या विसाव्या हप्त्यासोबत देण्यात येणारा नमो शेतकरीचा सातवा हप्ता एक महिना उशिराने अर्थात सप्टेंबरमध्ये देण्यात आला. त्यानंतर पीएम किसानचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये वितरित करण्यात आला. यासोबत नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र, तो निधीच्या तरतुदीअभावी देण्यात आला नाही. त्यानंतर पीएम किसानचा २२ वा हप्तादेखील १३ मार्च रोजी वितरित करण्यात आला. तरीदेखील आठव्या हप्त्याबाबत राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. मात्र, गेल्या आठवड्यात राज्य सरकारने आठव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केल्यानंतर बुधवारी (दि. २५) हा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला. हा हप्ता तब्बल चार महिन्यांनी वितरित करण्यात आला आहे, तर पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासोबत देण्यात येणारा नववा हप्ता निधीच्या तरतुदीनंतर देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्यात एकूण ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यात सर्वाधिक ५ लाख ४० हजार ६५९ शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून, सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ८४० शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. त्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ७३९, तर सातारा जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
Web Summary : Namo Farmer scheme payments delayed, decoupling from PM Kisan. Farmers received the 8th installment after a four-month gap. Over 89 lakh farmers are eligible; next installment uncertain.
Web Summary : नमो किसान योजना का भुगतान विलंबित, पीएम किसान से अलग। किसानों को चार महीने के अंतराल के बाद 8वीं किस्त मिली। 89 लाख से अधिक किसान पात्र; अगली किस्त अनिश्चित है।