पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:23 IST2025-11-18T10:23:12+5:302025-11-18T10:23:30+5:30
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील व कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात ३०० कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, ही जमीन सरकारी असल्याने हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले.

पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार
पुणे : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात दस्त नोंदणी करताना झालेल्या अनियमितता तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुठे समितीचा अहवाल मंगळवारी (दि. १८) नोंदणी महानिरीक्षकांना सादर केला जाणार आहे. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे सोमवारी नवी दिल्लीत असल्याने अहवाल सादर करता आला नाही. या जमीन गैरव्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राईझेस या कंपनीने सरकारी जमिनीची खरेदी करून मुद्रांक शुल्क बुडविल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात दुय्यम निबंधकांचे निलंबन करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. आता दस्त रद्द करण्याची प्रतीक्षा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील व कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यात ३०० कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, ही जमीन सरकारी असल्याने हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले तसेच त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची विभागाच्या पातळीवर तपासणी करण्यासाठी चौकशी करण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षक डॉ. सुहास दिवसे यांनी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवारी संपली. मात्र, अहवाल अंतिम करण्याचे काम सुरू असल्याने तो आज नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर बिनवडे अहवालानुसार कार्यवाही करतील, असेही सांगण्यात आले.