डोंगर फोडून कारखानदारी

By Admin | Updated: August 8, 2015 00:40 IST2015-08-08T00:40:22+5:302015-08-08T00:40:22+5:30

खराबवाडी व कुरुळीत दिवसाढवळ्या डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम सुरू असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पाहावयास मिळत आहे.

Mountain collapse factory | डोंगर फोडून कारखानदारी

डोंगर फोडून कारखानदारी

चाकण : खराबवाडी व कुरुळीत दिवसाढवळ्या डोंगर पोखरण्याचे काम सुरू असून, टेकड्यांचे संरक्षण करण्याऐवजी लचके तोडण्याचे काम सुरू असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पाहावयास मिळत आहे.
वाघजाई नगर रस्त्यावरील डोंगर एका उद्योजकाने डोंगर मधोमध फोडून दुभंगला आहे. त्यामुळे टेकडीवरील दत्ताचे मंदिर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोंगर टेकड्या फोडून पर्यावरणाची हानी करणा-या व टेकड्यांचे सौंदर्य नष्ट करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील खराबवाडी, वाघजाईनगर, कडाचीवाडी, महाळुंगे इंगळे, कुरुळी, निघोजे, वराळे, कोरेगाव खुर्द, भांबोली, वाकी, रासे, चिंबळी, केळगाव या गावांमध्ये अनधिकृतपणे टेकड्या फोडून मुरूम व डबर या गौण खनिजाचे उत्खनन सुरु आहे. डोंगर टेकड्या फोडून उद्योजकांनी कपारीमध्ये कारखाने उभे केले आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून संबंधित खात्याने बांधकामाची परवानगी दिली कशी, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे.
कुरुळी येथे पुणे - नाशिक महामार्गालगत मोठा डोंगर भुईसपाट होत आहे. प्रशासन या गोष्टींकडे कसा काणाडोळा करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी हायवे लगत डोंगर पोखरून बांधकामे केली आहेत. वाघजाई नगर येथील डोंगर मधोमध फोडून रस्ता केला आहे. या डोंगरावर दत्ताचे मंदिर, खराबवाडीच्या डोंगरावर महादेवाचे मंदिर, निघोजे येथील डोंगरावर पार्वती मंदिर व कुरुळीच्या डोंगरावरही एक मंदिर असल्याने हे डोंगर अर्धे शिल्लक आहेत. अन्यथा हे डोंगर संपूर्ण भुईसपाट झाले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
ज्या ठिकाणी डोंगर अद्याप भुईसपाट झाले नाहीत, त्या ठिकाणी प्रशासनाने व स्वयंसेवी संघटनांनी वृक्षारोपण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. टेकड्या नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Mountain collapse factory