पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:46 IST2025-10-22T13:45:44+5:302025-10-22T13:46:33+5:30
सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या २४ तासात ६० घटना घडल्या असून यातील ४२ घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे

पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही
पुणे : पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून मंगळवारी लक्ष्मीपूजन केले. मात्र या दरम्यान फटाक्याच्या ठिणगीमुळे अनेक ठिकाणी आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आगीच्या तब्बल साठहुन अधिक घटनांची नोंद झाली आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या चोवीस तासात या घटना घडल्या असून यातील बेचाळीस घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पाच नंतर घडल्याचे अग्निशमन दलाच्या मुख्य स्पष्ट करण्यात आले आहे. सुदैवाने या कोणत्याही घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. पण अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
शहरभर फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नानापेठे नगर, बाणेर, मार्केट यार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा आणि हडपसर यांसारख्या विविध भागात आगीच्या घटना घडल्या. फुरसुंगी येथील एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पेटते रॉकेट येऊन पडले. त्यामुळे सदनिकेत मोठी आग लागली. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. खराडीतील गेरा सोसायटीच्या आवारात पडलेल्या पेटत्या फटाक्यामुळे कचऱ्याने पेट घेतला. तसेच हडपसर लोहमार्गाजवळ पेटत्या फटाक्यांमुळे गवताला आग लागल्याची घटना घडली. गणेश पेठेतील मंदिराजवळील चंद्रकांत शहा अँड कंपनीचे कार्यालय आणि गोदामातही आग लागली होती. जे अग्निशमन दलाने नियंत्रण आणली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्री दत्त मंदिराजवळील इमारतीची गच्ची येथे आग लागली होती. कसबा पेठेतील कागदीपुरा भागातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर तसेच विमाननगरमधील संजय पार्क भागात नारळाच्या झाडावर पेटता फटाका पडल्याने आग लागली. शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीसमोरील एका घराच्या छतावर साचलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी सुरू झाली. आणि रात्री नऊ वाजेपर्यंत बेचाळीस ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या घटनांमुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतिषबाजी वेळी सुरक्षिततेची नियम पाळणे किती आवश्यक आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या सर्व वाहनांची अक्षरशः धावपळ सुरू होती. सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या सुमारे पंचवीस गाड्यांनी चाळीसहून अधिक ठिकाणी आगी विझवल्या. मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, नवले, वारजे, बाणेर, येरवडा, कोथरूड, धानोरी आणि गंगाधाम केंद्रातील अधिकारी आणि जवान दिवसभर रस्त्यावर होते. काही ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागले. दिवाळीच्या दिवशी सुद्धा अग्निशमन कर्मचारी घरच्यांपासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आजचा दिवस आम्हाला सर्वांत धकाधकीचा गेला. अनेक कॉल एकाच वेळी आले. पण आमच्या पथकांनी तातडीने प्रतिसाद देऊन मोठे अनर्थ टाळले. नागरिकांनी फटाके फोडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.