Monsoon Update: वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० किमी असणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:45 IST2025-05-24T12:40:35+5:302025-05-24T12:45:10+5:30
गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Monsoon Update: वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० किमी असणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे : पुढील ४८ तासांत नैर्ऋत्य मौसमी वारे (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दक्षिण कोकण किनारपट्टीलगत मध्य पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. यामुळे पुढील चार दिवसांत (दि. २३ ते २६) कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार, तर काही भागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांतील घाट विभाग, नांदेड, लातूर, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. यावेळी वाऱ्यांचा ताशी वेग ५० ते ६० इतका असेल. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे, तर अन्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट दिला आहे.