नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:05 IST2025-12-06T10:05:19+5:302025-12-06T10:05:30+5:30
तरुणाने नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात सोने चोरून एका सराफ पेढीत विक्री केल्याचे सांगितले

नर्तकीसोबत बैठक अन् नाचगाण्याचा छंद; पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात चोरी, पुण्यातील घटना
पुणे : नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्याला फुरसुंगी पोलिसांनीअटक केली आहे. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असे पोलिसांनीअटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळकरवाडी येथील अभिजित पठारे हे विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाली होती. यात अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलिस कर्मचारी सागर वणवे आणि अभिजित टिळेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अभिजित पठारे यांच्या घरी राहुल पठारे याने चोरी केली असून, त्याने चोरीचे सोने महंमदवाडी येथील एका सराफी पेढीत विक्री केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी राहुल पठारेला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये त्याला नर्तकीसोबतच्या बैठकीचा आणि नाचगाण्याचा छंद आहे. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्यामुळे त्याने अभिजित पठारे यांच्या घरात चोरी केली. चोरीच्या ऐवजाबाबत विचारले असता, त्याने चोरीतील काही सोने महंमदवाडी येथील एका सराफ पेढीत विक्री केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, कर्मचारी महेश नलवडे, नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, हरिदास कदम, सतीश काळे यांच्या पथकाने केली.