बावधन येथे बहुमजली इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:13 IST2026-01-05T18:12:53+5:302026-01-05T18:13:03+5:30
आगीच्या तीव्रतेमुळे वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मधील खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ झळ पोहोचली.

बावधन येथे बहुमजली इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली
कोथरूड : बावधन परिसरातील सूर्यदत्ता महाविद्यालयासमोर असलेल्या विवा हॉल मार्क सोसायटीत सोमवारी (दि. ५) दुपारी आग लागल्याची घटना घडली. घरात कोणी नसताना ही घटना घडली. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्राऊंड प्लस या ११ मजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ८०२ मध्ये ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच एनडीए अग्निशमन केंद्र, चांदणी चौक येथील पथक दुपारी १:४० वाजता घटनास्थळी दाखल झाले. सुमारे पावणेतीनच्या आसपास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अग्निशमन दल चांदणी चौक येथील प्रभारी अधिकारी सुनील नामे यांच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत दोरीच्या सहाय्याने आठव्या मजल्यावर होजरील नेली. खिडकी तसेच मुख्य दरवाजातून पाण्याचा मारा करत जवानांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या आगीत फ्लॅटमधील हॉलचे इंटिरिअर, इलेक्ट्रिक वायरिंग, टीव्ही, सोफा, स्टडी रूममधील कपाट, पुस्तके, बेड तसेच खिडक्यांच्या काचा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर दोन खोल्या व स्वयंपाकघरात धुरामुळे रंग खराब झाला.
आगीच्या तीव्रतेमुळे वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मधील खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोसायटीची अग्नी प्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आल्याने ती तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे जवान चंद्रकांत गावडे, चालक दत्ता गोगावले, पंढरीनाथ उभे, शिवकुमार माने, श्रीधर यादव, मनोज गायकवाड, रमेश थोपटे, राकेश नाईकनवरे यांनी आग आटोक्यात आणली.