Video : मराठी रिक्षाचालकांनाच परवाने द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू; अमित ठाकरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 19:12 IST2026-04-26T19:11:45+5:302026-04-26T19:12:33+5:30
Marathi language policy : ४ तारखेच्या संपाबाबत आम्ही नंतर बोलूच, पण आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा रस्त्यावर मारू, असा इशारा मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिला.

Video : मराठी रिक्षाचालकांनाच परवाने द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू; अमित ठाकरे यांचा इशारा
पिंपरी : ज्या रिक्षा चालकांना मराठी येते किंवा जे मराठी आहेत, त्यांनाच परवाने द्यावेत. या सरकारच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ज्यांना मराठी बोलायचे नाही, त्यांनी आपल्या शहरात परत जावे. आमचे मराठी रिक्षाचालक मुंबई आणि महाराष्ट्र चालू ठेवण्यास सक्षम आहेत. ४ तारखेच्या संपाबाबत आम्ही नंतर बोलूच, पण आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा रस्त्यावर मारू, असा इशारा मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिला.
पिंपरी येथे रविवारी (दि. २६) आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला. यावेळी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर, शहराध्यक्ष सचिन चिखले आदी उपस्थित होते. अमित ठाकरे म्हणाले, मराठी माणसाच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तुम्ही अंगावर आलात नाहीत, तर आम्ही काही करणार नाही. मीडियात दिसण्यासाठी जे लोक फालतू वक्तव्ये करतात, त्यांना उत्तर देण्यात मला रस नाही.
शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न गंभीर
अमित ठाकरे म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत न्यायालयीन निर्णयाचा उल्लेख करत निवडणुकीच्या तोंडावर या योजना सुरू केल्या आहेत. पुण्यातील पाणीटंचाई, नदी सुधार प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड यांसारक़े स्थानिक प्रश्न आहेत. या समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावे.
ड्रग्जप्रकरणी ठोस कारवाई होत नाही.
अमित ठाकरे म्हणाले, ड्रग्जची वाढती समस्या चिंताजनक आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम ड्रग्ज विक्री होत असून, ओव्हरडोसमुळे मृत्यू होत आहेत. तरीही ठोस कारवाई किंवा गुन्हे नोंदवले जात नाहीत. पोलिसांना २४ तास ‘फ्री हॅण्ड’ देऊन राज्य ड्रग्जमुक्त करावे.