Marathi Bhasha Gaurav din: मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:41 IST2026-02-27T11:40:41+5:302026-02-27T11:41:26+5:30
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो

Marathi Bhasha Gaurav din: मराठी शाळा खरंच बंद पडत आहेत का? पालकांचा कल इंग्रजीकडे; वास्तव काय सांगते?
पुणे : मराठी माध्यमातील शाळा खरोखरच बंद पडत आहेत का, हा प्रश्न सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. गेल्या काही वर्षांत काही ठिकाणी मराठीशाळांवर टाळे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः महानगरांमध्ये मराठी माध्यमातील शाळांची संख्या आणि विद्यार्थी पटसंख्या घटल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी संख्या घटल्याने वर्ग एकत्रित करणे, तर काही शाळा पूर्णपणे बंद करण्याचे निर्णय घ्यावे लागले आहेत. मात्र सर्वच मराठी शाळा बंद पडत आहेत, असे चित्र नाही. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या उत्तम दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अजूनही अनेक मराठी शाळा टिकून आहेत. पण शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
नुकतेच शालेय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत सुमारे २५५ मराठी शाळा विविध कारणांमुळे बंद पडल्या. विशेषतः मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये मराठी माध्यमातील शाळांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात मराठी शाळांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे घटत जाणारी विद्यार्थीसंख्या.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल
सध्याच्या स्पर्धात्मक आणि जागतिक वातावरणात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्यास मुलांना अधिक संधी उपलब्ध होतील, असा समज पालकांमध्ये दृढ झाला आहे. रोजगार, उच्च शिक्षण आणि परदेशी संधी यासाठी इंग्रजीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, अशी धारणा आहे. परिणामी, अनेक पालक आर्थिक ओझे पत्करून मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यास प्राधान्य देतात.
नेमकी अवस्था काय?
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमातूनच शिक्षण दिले जाते. मात्र शहरांमध्ये पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी माध्यमाची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी मराठी शाळा ‘सेमी-इंग्रजी’चा पर्याय देत आहेत, जेणेकरून पालकांचा विश्वास टिकवता येईल. शहरातील महापालिकेच्या शाळांची बिकट अवस्था आहे.
पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवतात का?
१) रोजगाराच्या संधींची भीती : अनेक पालकांना वाटते की, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यास मुलांना पुढे चांगल्या नोकरीच्या संधी मिळतात.
२) सामाजिक प्रतिष्ठा : इंग्रजी शाळेत मुले शिकतात, ही एक प्रकारची प्रतिष्ठेची बाब मानली जाते.
३) आधुनिक सुविधा : खासगी इंग्रजी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, ॲक्टिव्हिटीज बेस्ड शिक्षण, इंग्रजी संभाषणावर भर अशा सुविधा असतात.
४) सरकारी शाळांची प्रतिमा : काही ठिकाणी पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याने पालकांचा विश्वास कमी झाला आहे.
मातृभाषेचे महत्त्व काय सांगते?
शिक्षण तज्ज्ञांचे मत मात्र वेगळे आहे. लहान वयात मातृभाषेत शिक्षण घेतल्यास मुलांची आकलनशक्ती अधिक मजबूत होते. संकल्पना स्पष्टपणे समजतात. विचार मांडण्याचा आत्मविश्वास वाढतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यावर भर देण्यात आला आहे. तरीही पालकांचा कल इंग्रजीकडे झुकलेला दिसतो.
मराठी शाळांची सकारात्मक बाजू
सर्व चित्र नकारात्मक नाही. अनेक मराठी शाळांनी डिजिटल साधनांचा वापर सुरू केला आहे. काही जिल्ह्यांतील शाळांनी राज्यस्तरीय निकालात उत्कृष्ट यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा उपक्रम यामुळेही काही शाळांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सेमी-इंग्रजी’चा पर्याय देऊन काही शाळा पालकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढचा मार्ग कोणता?
मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ भावनिक भूमिका पुरेशी नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि पालकांशी प्रभावी संवाद आवश्यक आहे. इंग्रजीचे ज्ञान महत्त्वाचे असले तरी शिक्षणाची पायाभरणी मातृभाषेतच अधिक भक्कम होते, हे पटवून देणे गरजेचे आहे.
जी भाषा शालेय शिक्षणातून हद्दपार होते, त्या भाषेला फार भवितव्य नसते. मात्र आता पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल आहे. या नावाखाली मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. कारण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे यात कुणालाही रस नाही. त्यापेक्षा इंग्रजी शाळा काढणे म्हणजे प्रचंड आर्थिक व्यवहार हे साधे कारण त्यामागे आहे. संस्थाचालक यांच्यापासून शिक्षण विभाग, खाजगी क्लासेस, दुकाने या सगळ्यांचीच हातमिळवणी यामागे आहे.- आनंद भंडारे, कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र
आजचं जग खूप स्पर्धात्मक आहे. पुढे उच्च शिक्षण, परदेशातील संधी किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असेल, तर इंग्रजी येणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. म्हणूनच मी माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं. मराठी भाषा आपण घरी शिकवतोच; पण शाळेतून त्याला जागतिक पातळीवर स्पर्धा करता यावी, ही माझी अपेक्षा आहे. -(इंग्रजी माध्यम समर्थक पालक)
लहान मुलांनी प्रथम आपल्या मातृभाषेत शिक्षण घ्यावं, असं माझं ठाम मत आहे. मराठीत शिकल्यामुळे संकल्पना पटकन समजतात आणि मुलं आत्मविश्वासाने बोलतात. इंग्रजी महत्त्वाचं आहेच; पण ते विषय म्हणून शिकता येतं. पायाभरणी मातृभाषेत मजबूत झाली, तर पुढे कोणतीही भाषा शिकणं कठीण राहत नाही. म्हणून मी माझ्या मुलाला मराठी शाळेतच प्रवेश दिला आहे. -(मराठी माध्यम समर्थक पालक)